पुणे Lok Sabha Election 2024: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार गट ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपामध्ये म्हणजेच घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "पक्षामध्ये येण्याचं जर त्यांचं मत असेल, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करत आहोतच. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही, म्हणत नाही. कारण शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आणि त्यासाठी येणारी जी काही नेते आहेत जसं की, अशोक चव्हाण, अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील, त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग आहे."
केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल : यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत, पण त्यांची मुलगी येत नाही, याबाबत विचारलं. यावर ते म्हणाले की, "केंद्रीय आणि राज्य समिती याबाबत विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील. तुटक-तुटक निर्णय होणार नाही. राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल."
आमची कुणाचीही ना नाही : एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला अजून ग्रीन सिग्नल नाही का? यावर बावनकुळे म्हणाले की, "ग्रीन सिग्नलची गरजच नाही. शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वाला ज्यांना ज्यांना भाजपामध्ये यायचं असेल, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असो. आजही पुण्यामध्ये काही पक्षप्रवेश झाले. त्यामुळं पक्ष प्रवेशासाठी आमची कुणाचीही ना नसते."