ठाणे T Raja Singh Statement : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून तेलंगणा येथील प्रक्षोभक वक्तव्य करण्यामुळं चर्चेत असणारे, आमदार टी. राजा सिंह (T Raja Singh) हे उपस्थित होते. या सभेत त्यांनी "लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपा 400 पार झाले असते तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते" असं सांगताच उपस्थितांनी जयजयकार केला. यावेळी व्यासपीठावर बालयोगी सदानंद महाराज, महंत शिर चिदानंद सरस्वती, स्वामी गोविंदगिरी, महंत फुलनाथ बाबा, आयोजक शिवरूपानंद स्वामी उपस्थित होते. तर सभेला तालुक्यातून हजारोंच्या संख्येने हिंदू धर्मीय उपस्थित होते.
किल्ल्यांवरील कब्जा साफ करावा: हिंदू धर्मसभेत धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा, वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा, लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, गो हत्या बंदी करून अंमलबजावणी व्हावी, बेकायदेशीर भूमी अतिक्रमण हटविण्यात यावे असे विविध ठराव पारित करण्यात आले. या सभेत बोलताना टी. राजा सिंह यांनी महाराष्ट्रात मठ मंदिर सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 370 किल्ले जिंकले पण दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बनविण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुका आहेत त्यापूर्वी किल्ल्यांवरील कब्जा साफ करावा असं आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
...तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही : महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. तर भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालय, क्रीडांगण, महाविद्यालय, घर बनवा असं आवाहन केलं. शिवाय हिंदू मुस्लिम भाई भाईचा नारा देत मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही असा सवाल विचारत हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
मलंगगड मुक्ती केली पाहिजे: महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचं भय आहे. त्यांच्यामागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्ती केली पाहिजे. मलंगगड मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचं सांगून हिंदूंची थट्टा केली जात आहे. हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्ती केली पाहिजे अशी मागणी केली. "जो हिंदू हित की बात करेगा वह, महाराष्ट्र पर राज करेगा" अशी घोषणा त्यांनी केली.