ठाणे: सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे रवींद्र चव्हाणहे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर डोंबिवली मतदार क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही प्रमाणात वर्चस्व पूर्वीपासून आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील आदी भाजपाच्या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय संपादित केला आहे. मागील तीन टर्म स्वतः रवींद्र चव्हाण यांनी याच मतदारसंघात विजय प्राप्त केला असून आताही रवींद्र चव्हाण मैदानात त्याच जोराने कार्यरत झाले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे दीपेश म्हात्रेयांनी जोरदार प्रचारात आघाडी घेतल्यानं सांस्कृतिक नगरीत भाजपा विरुद्ध उद्धव सेनेमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
दोघांमध्ये काटे की टक्कर : डोंबिवलीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत होणार आहे. महायुती माध्यमातून भाजपाचे रवींद्र चव्हाण तर उद्धव सेनेचे दीपेश म्हात्रे अशा दोघांमध्ये दोघांमध्ये काटे की टक्कर होणार आहे. कडोंमपाचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे दीपेश म्हात्रे हे चिरंजीव असून त्यांना महापालिकेतील राजकीय मोठा अनुभव पाठीशी आहे. त्यांनी स्वतः स्थायी समिती सभापती पद भूषविलं असून, यापूर्वीही त्यांनी भाजपाचे रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर कमी वयात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
डोंबिवली चर्चेचा विषय : डोंबिवली विधानसभा मतदारसंघ मुळात शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे हे अनेकवेळा सिद्ध झालंय. संपूर्ण मतदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय लोकवस्ती असून आता शहर कॉस्मोपॉलिटन म्हणून ओळखले जात आहे. येथील स्थानिक आगरी भूमिपुत्र बरोबर मराठी, गुजराती, मारवाडी, कोकणी अशी दाट लोकवस्ती असल्यानं पायाभूत सुविधा लोकांना त्रासदायक ठरत आहेत. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, शासकीय रुग्णालयाची कमतरता, रेल्वे प्रवासात होणारी लोकांची ओढाताण, परिणामी होणारे अपघात, आदी कारणानं डोंबिवली नेहमीच चर्चेचा विषय होत असते. निवडणुकीचा हंगाम आला की, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर खापर फोडून वेळ मारून नेतात आणि शहराची स्थिती तशीच राहते.