महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

...तर मी बारामतीमधून निवडणूक लढवणार; अजित पवारांचा खुलासा, शरद पवारांवर साधला निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर निघून गेल्यानं ही चर्चा सुरू झाली होती. यावर आता त्यांनी खुलासा केला.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

AJIT PAWAR ON SHARAD PAWAR
अजित पवार (Source - Social Media)

मुंबई : नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नसून, महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतीही धूसफूस नसल्याचा खुलासा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. महायुती सरकारमध्ये 'ऑल इज वेल' परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला. "पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर जावं लागलं," असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ही माहिती दिली. 'आयाराम गयाराम' संस्कृतीवर बोलणारेच आता त्या प्रकारात गुंतल्याची टीका त्यांनी नाव न घेता शरद पवारांवर केली.

बारामतीतून उभा राहणार : "बारामती मतदारसंघ जर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडं आला तर पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणं होईल," असं सांगत अजित पवारांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केला. अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर आता खुद्द अजित पवारांनीच खुलासा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत बोलताना (Source - ETV Bharat Reporter)

जागावाटवाबाबत चर्चा सुरु : "लोकसभा निवडणूक ही महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढवलेली पहिली निवडणूक होती. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्षांची मते परस्परांना मिळण्याबाबत आमची चर्चा झाली असून, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केलं. "महायुतीच्या जागावाटवाबाबत चर्चा सुरु असून, आमच्या तिघांच्या सहमतीनं जागावाटप जाहीर करु," असं त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यक्रम टप्याटप्याने होणार : "राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रवेश होणार आहे, मात्र टप्याटप्याने हे प्रवेश होतील," असं अजित पवार यांनी सांगितलं. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाविषयी बोलताना त्यांनी अद्याप असा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं. निंबाळकरांशी मी, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला : "प्रत्येक खात्याला एखाद्या योजनेबाबत मत मांडायचा अधिकार आहे, निर्णय प्रक्रियेत नोटिंग लिहिण्याचा त्यांना अधिकार आहे, त्याप्रमाणे फाईलींवर खात्याचं मत नोंदवलं जातं. मात्र, त्यानंतर निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो," असं स्पष्टीकरण त्यांनी अर्थखात्याच्या काही योजनांवर आक्षेप घेतल्याच्या चर्चेवर दिलं.

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये पत्रकारांचा समावेश नाही :राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर बोलताना त्या यादीत एकाही पत्रकाराचा समावेश नाही. त्यामुळं त्यावर जास्त लक्ष देऊ नका, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

हिंदी कशाला, मराठीत बोलतो : यावेळी हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं प्रश्नाचे उत्तर हिंदीत देण्याची विनंती केल्यावर अजित पवारांनी "हिंदी कशाला, मराठीत बोलतो, मराठी आता अभिजात आहे" असं उत्तर दिलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा नुकताच मिळाला आहे, त्यामुळं मराठीत बोलण्याचा आग्रह अजित पवारांनी दोन वेळा केला.

विशेष पत्रकार परिषद : अजित पवार यांची विशेष पत्रकार परिषद मुंबईत झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आमदार शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आमदार सरोज अहिरे, विक्रम काळे, माजी खासदार आनंद परांजपे, प्रवक्ते सूरज चव्हाण, संजय तटकरे, नरेंद्र राणे व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

  1. "शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची केलेली अवस्था..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
  2. अभिनेते सयाजी शिंदेंनी हातात बांधलं घड्याळ; 'स्टार प्रचारक' म्हणून नियुक्ती
  3. नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं पत्र
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details