मुंबई Ajit Pawar On Mahendra Thorve : राज्यातील विधानसभा निवडणुका आगामी दोन महिन्यात लागू शकतात. त्या अनुषंगानं सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. एका बाजूला महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी रणनीती आखत आहे, तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्षांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस विश्वासघातकी पार्टी असल्याचं म्हटलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा आज मुंबईत दाखल झाली आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दिकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांच्या मतदारसंघात यात्रा जाणार आहे. यावेळी झिशान सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर नवाब मलिक आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "कार्यक्रम होऊ द्या, तेव्हा समजेल व्यासपीठावर कोण कोण येणार आहेत."
इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही :शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले, "इतर लोक काय बोलतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देतो.इतरांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही.
महेंद्र थोरवे दखल घेण्याच्या पात्रतेचे नाहीत : आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "महेंद्र थोरवे यांची मला दखल घेण्याची गरज नाही, त्यांना योग्य ते उत्तर स्थानिक पातळीवर आमचे नेते देतील. त्यांच्या आरोपानं मला काही फरक पडत नाही. कारण ते माझ्या मतदारसंघातील नाहीत." महेंद्र थोरवेहे दखल घेण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला.
महेंद्र थोरवे काय म्हणाले होते :"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विश्वासघात करणारी पार्टी आहे, हे मी जाहीरपणाने सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच यांचं काम आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नेतृत्वच विश्वासघातकी आहे," अशी टीका महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता केली होती.
मुंबईत असेल तर राखी बांधून घेईन : "रक्षाबंधनाचा सण आज साजरा केला जात आहे, जन सन्मान यात्रा मुंबईत असल्यामुळे मुंबईत ज्या ज्या बहिणी आहेत, त्यांच्याकडून आपण राखी बांधून घेणार. सुप्रिया जर मुंबईत असेल तर तिच्याकडून देखील राखी बांधून घेईन," असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा
- महायुतीत ठिणगी : शिवसेनेच्या 'वाघाचा' भाजपाच्या मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले शंभर टक्के युती तोडण्याचा प्रयत्न होतोय - Ramdas Kadam On Ravindra Chavan
- महाराष्ट्रात येणार नमक हराम 2 चित्रपट; 'चित्रपटाची कथा, पटकथा मी देणार,' संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Sanjay Raut On Eknath Shinde
- संभाजी भिडे यांच्या प्रश्नावर भडकले शरद पवार : म्हणाले 'मी त्यांच्यावर बोलावं इतकी त्यांची लायकी नाही' - Sharad Pawar On Sambhaji Bhide
- ताई नाशकात दादा मुंबईत ; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेले 'हे' बहीण भाऊ आज राखी बांधणार का ? - Raksha Bandhan 2024