पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोयता गँग, टोळ्या, महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न, या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या प्रश्नाला उत्तर देताना, अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. वरिष्ठ पोलिसांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं आम्ही त्यांच्या जागी दुसरे अधिकारी आणू असं यावेळी अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री? :यावेळी अजित पवार म्हणाले की, "यासंदर्भात मी पुणे पोलीस आयुक्ताशी चर्चा करणार आहे. ज्यांच्या मुदती संपल्या आहेत त्यांच्या जागी पुण्याच्या विकासासाठी काही नवीन अधिकारी नेमण्यात यावे. शहरातील गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. राजकीय हस्तक्षेप नसला तर पोलिसांना काम करायला अवघड जात नाही. पुण्यात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही. एवढी मुभा असताना देखील जिल्ह्यात तसेच राज्यात कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर याला कुठेतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडत आहे. यात जर वरिष्ठ पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ठ सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आम्ही इतर दुसरे चांगले अधिकारी आणून या सगळ्यांना चाप बसवण्याचा काम आणि गुन्हेगारीला आळा बसवण्याचा काम करू".