मुंबई Dispute in Mahayuti : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होण्याऐवजी काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळं चांगलीच जुंपली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) अनुषंगानं जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, अमोल मिटकरी (Amol Mitkari) सध्या त्यांच्या बेताल वक्तव्यामुळं चांगलेच चर्चेत आहेत. आता जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य करून अमोल मिटकरी यांनी नवीन वादाला तोंड फोडलं आहे. यावरून महायुतीत राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुतीच्या शिंदे शिवसेना गट आणि भाजपा नेत्यांनीही अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली असून राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना याबाबत जाब विचारला आहे.
महायुतीत मिठाचा खडा : जागा वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महायुतीत आम्हाला जर का ५५ जागा मिळत असतील तर आम्ही समाधानी असणार नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष हे १०० जागांचा दावा करत आहे. जर का महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी १०० जागांची मागणी ताणून धरली तर अशा परिस्थितीत प्रत्येकाला वेगळी निवडणूक लढवावी लागेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल मिटकरी यांचा अशा पद्धतीच्या विधानानं महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
मिटकरींची भूमिका अधिकृत आहे का: अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. त्यांना कोणी अधिकार दिला आहे का? त्यांची भूमिका अधिकृत आहे का? हे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर करावं. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. पण वारंवार त्यांचं असं वागणं हे महायुतीसाठी घातक आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हे जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्या भूमिकेबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर मिटकरी यांच्या मागे कोणी बोलवता धनी आहे का? हे सुद्धा तपासून पाहावं लागेल.