उत्तर प्रदेश (UP) मधील हाथरस येथे नुकतीच एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत एका कॉन्स्टेबलचा महाराज बनलेल्या या स्वयंघोषित महाराजानं आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 120 लोक मरण पावले. ज्या समाजाने स्वयंघोषित दैवी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला आहे अशा समाजाच्या सामूहिक विवेकबुद्धीला हा एक इशारा आहे. एका बाजूनं विचार करायचा झाल्यास हे प्रशासकीय अपयश होतं. ज्यासाठी जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तींना क्षिक्षा झाली पाहिजे. परंतु देशभरात स्वयंभू महाराजांचा प्रसार पाहता, या मोठ्या समस्येवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. समाजाने त्यांना देवत्व दिलं, किंवा अलौकिक शक्तींनी संपन्न म्हणून दिलेला उच्च दर्जा अस्वस्थ करणारा आहे. हाथरस येथील भयंकर घटनेला जे लोक बळी पडले, त्यांच्यावर यांच्या संमोहनाचा प्रभाव होता, त्यामुळे ते अंशतः या सगळ्याला जबाबदार आहेत.
या घटनेची माहिती घेतली असता असं लक्षात येतं की, कथित महाराजांच्या चरणांचा स्पर्ष ज्या भूमिला झाला. त्या भूमिला वंदन करण्याच्या हेतूनं धावपळ करताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. आध्यात्मिकतेने भारावलेल्या भारतासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अशा दैवी शक्तींचं अस्तित्व मानणाऱ्या लोकांचे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे काही नवखी गोष्ट नाही. त्याचवेळी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे, ती म्हणजे काही स्वयंघोषित महाराज दुष्कृत्यात गुंतले आहेत, ज्यामुळे समाजाच्या नैतिक विवेकाला धक्का बसला आहे.
त्याचवेळी ही गोष्टही समजून घ्यायला पाहिजे की, एखाद्याच्या वैचारिक मांडणीमुळे ते आध्यात्मिक चेतना पुन्हा जागृत करतात आणि समाजांना एकत्र आणतात, अशा लोकांचे वाईट चित्रण करणेही टाळले पाहिजे. तसंच देवमाणसाचा मुखवटा घातलेले अनेक दांभिक लोक धर्मांधतेचे समर्थन करतात, जे मानवी चेतना आंधळी करतात आणि त्याला रूढीवादी विचारांची जोड देतात. त्यातून बौद्धिक आणि आध्यात्मिक वाढीस अडथळा निर्माण होतो.
'गॉडमन'चा प्रभाव जनमानसावर इतका असतो की, त्यांना पृथ्वीवरील मसिहा म्हणून लोक डोक्यावर घेतात. मात्र ते लोकांच्या मानसिक क्षमतांना क्षीण करतात आणि गंभीर विचार शक्तीला बाधा आणतात. मात्र आर्थिक आणि सामाजिक स्तराच्या उतरंडीतील सगळ्यात तळाशी असलेले लोक त्यांच्या चरणी मोक्ष शोधतात यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. जीवनातील दु:खापासून मुक्तीचे मार्गदर्शक म्हणून, हे महाराज आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाच्या शारीरिक आणि मानसिक भावनेवर जबरदस्त वर्चस्व गाजवतात.
हाथरस येथे घडलेल्या घटनेचा दोष तथाकथित महाराजांना द्यायचा का?