नवी दिल्ली Teesta Water Management Project : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना पुढील आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी चीननं त्यांना सुखद धक्का दिला आहे. बांगलादेशनं तीस्ता नदी व्यवस्थापन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाबाबत कोणतीही भूमिका घेतल्यास चीन त्याचं स्वागतचं करेल, असं चीनच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासाठी ही स्वागतार्ह बाब आहे. विशेष म्हणजे भारतानं या प्रकल्पात स्वारस्य दाखवल्यानं अभ्यास करण्यासाठी तांत्रिक टीम पाठवण्याची घोषणा केल्यानंतर चीनचं हे स्पष्टिकरण आलं आहे. मागील महिन्यात शेख हसिना यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान भारतानं हा निर्णय जाहीर केला.
बांगलादेशसोबत चांगले संबंध राखण्यास चीन तयार :बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी भारत भेटीवर असताना भारतानं तीस्ता नदी प्रकल्पाविषयी स्वारस्य दाखवलं. त्यानंतर गुरुवारी ढाका इथं बांगलादेशातील चीनचं राजदूत याओ वेन यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, बांगलादेश जोपर्यंत TRCMRP बाबत निर्णय घेत आहे, तोपर्यंत त्यांच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखण्यास मदत होत असेल, तर चीन याबाबत तयार आहे. ढाका इथल्या प्रसारमाध्यांनी याओ वेन यांच्या हवाल्यानं याबाबतची माहिती दिली. “बांगलादेशसाठी जर TRCMRP हा प्रकल्प जर अनुकूल असेल, तर आम्ही बांगलादेशची भूमिका स्वीकारण्यास तयार आहोत. त्यामुळे यापुढं या प्रकल्पावर काय भूमिका घ्यायची हे पूर्णपणे बांगलादेशवर अवलंबून आहे."
चीन आहे भारतासोबत काम करण्यास इच्छुक ? :चीनचे बांगलादेशमधील राजदूत याओ वेन यांनी ढाका इथं प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांना TRCMRP या प्रकल्पावर चीन भारतासोबत काम करण्यास इच्छुक आहे का, असं विचारलं. यावेळी "मी म्हणालो की हे पूर्णपणे बांगलादेशनं ठरवायचं आहे. आम्ही कोणत्याही भूमिकेसाठी तयार आहोत. आम्हाला बांगलादेशचे शेजारील देशांशी चांगले संबंध आहेत, हे पाहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, हे तुमच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे." बांगलादेशच्या विनंतीनुसार चीननं तिस्ता नदीच्या सततच्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी अभ्यास केला. चायनीज पॉवर कॉर्पोरेशननं TRCMRP या प्रकल्पाचा अहवाल सादर केला. त्यानंतर बांगलादेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अहवालाला मान्यता दिली. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी चीननं बांगलादेशला 1 अब्ज डॉलर्सचं कर्जही देऊ केलं.
काय आहे बांगलादेशचा TRCMRP तीस्ता प्रकल्प ? :तीस्ता नदीमुळे बांगलादेशात शेतकरी सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र ही नदी बांगलादेशात प्रवेश करण्यापूर्वी भारताच्या सिक्किम आणि पश्चिम बंगालामधून वाहते. तीस्ता नदीची एकूण लांबी 414 किमी आहे. मात्र यापैकी 151 किमी ती सिक्किममधून तर 142 किमी ती पश्चिम बंगालमधून वाहते. बांगलादेशात तीस्ता नदीची लांबी 121 किमी आहे. तीस्ता नदीवर करोडो लोकांची उपजिविका अवलंबून आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीस्ता नदीच्या पाणी वाटपावरुन आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद निर्माण झाला. तीस्ता नदी बांगलादेशासह भारतातही सिंचन, पिण्याचे पाणी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र आता तीस्ता नदीला हंगामी पाण्याची टंचाई, गाळ आणि प्रदूषणासारख्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. यामुळे तीस्ता नदीचं संवर्धन आणि व्यवस्थापन करणं बांगलादेशी सरकारसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. TRCMRP या प्रकल्पाची सुरुवात बांगलादेश सरकारनं जलस्रोत व्यवस्थापन, पूर नियंत्रण आणि व्यवस्थापन, इकोसिस्टम जीर्णोद्धार, प्रदूषण नियंत्रणासाठी केली. यामध्ये कृषी, औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी पाण्याचं शाश्वत आणि वितरण करण्याचा सहभाग आहे. पावसाळ्यात महापूर टाळण्यासाठी उपाययोजना राबवणं आणि टंचाईच्या काळात पाण्याचा प्रवाह व्यवस्थापित करणं हे देखील या प्रकल्पाचा भाग आहे. जैवविविधतेला पाठिंबा देऊन पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नदीला पुनर्संचयित करणं, कठोर नियमांद्वारे प्रदूषण पातळी कमी करणं आणि उद्योगाला प्रोत्साहन देणं यावर हा प्रकल्प निगराणी राखणार आहे.