हैदराबाद Morarji Desai -भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आज जन्मदिन. देशाचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान यापासून काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी भूमिका घेणारा महाराष्ट्रद्वेष्टा नेता इथपर्यंत मोरारजीभाई देसाई यांची राजकीय कारकीर्द अत्यंत गाजलेली आहे. एकीकडे तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून मोरारजी देसाई यांचं कौतुक होतं. त्याचवेळी महाराष्ट्र निर्मितीमध्ये मोरारजी देसाई यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळं १०५ महाराष्ट्र वीरांना हौतात्म्य पत्करावं लागलं याची खंत सर्वच महाराष्ट्रीय मनात कायमची रुतली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेत प्र. के. अत्रेंपासून श्रीपाद अमृत डांगेंपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी रान उठवलं होतं. मात्र तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी १९५५ साली २० नोव्हेंबरला मुंबई चौपाटीवर घेतलेल्या सभेत संपूर्ण मराठी जनतेच्या रागाचा पारा चढून त्याचा कडेलोट होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. याच सभेमध्ये दुसरे नेते स. का. पाटील यांनीही अशाच प्रकारच्या वक्तव्यानं मराठी जनतेचा रोष ओढवून घेतला होता. यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला अधिकच धार आली होती. त्याचं कारणही तसंच घडलं. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलनावर गोळीबार झाला. त्यामध्ये अनेकांचा जीव गेला. शेवटी १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र साकारला. मुंबईत फ्लोरा फाउंटन भागात त्यांचं हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मोरारजी देसाई यांचं राजकारण कधीच पटलं नाही. नेहमीच गुजरात धार्जिणी भूमिका मोरारजी देसाई यांनी घेतल्यानं ते नेहमीच टीकेचे धनी ठरत राहिले.
त्या काळात महाराष्ट्र किंवा गुजरात राज्याची निर्मितीही झालेली नव्हती. मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध केला. त्यामुळे त्यांना या चळवळीचे शत्रू मानलं गेलं. मात्र कुणालाही न जुमानता संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करावीच लागली. १ मे १९६० रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ रोजी त्या काळातील भदैली या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील (आताचे गुजरात) गावात झाला. २९ फेब्रुवारीचा वाढदिवस असल्यानं चार वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा करणारे ते नेते होते. शिक्षण घेतल्यावर 1917 मध्ये त्यांची मुंबई प्रांत नागरी सेवेत निवड झाली होती. इंग्रजांच्या काळात 1927-28 मध्ये त्यांनी गोध्रा येथे उपायुक्तपदी काम केलंय. त्यावेळी तिथे दंगल झाली होती. या दंगलीनंतर मोरारजी देसाई यांनी आपल्या नागरी सेवा पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 1952 मध्ये मुंबईचे मुख्यमंत्री झाले. आपल्या आदर्शांना मानणाने म्हणून मोरारजी देसाई यांची ख्याती होती. मोरारजी देसाई शिवांबू अर्थात स्वमूत्रप्राषन करत असत. ते आपल्या आरोग्याचं हेच एक मोठं गुपित असल्याचं ते सांगत. त्यामुळेच ९९ वर्षे ते जगले असंही सांगण्यात येतं.