न्यूयॉर्क UN Security Council approves US Drafted : गाझामध्ये युद्धबंदीचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलाय. याअंतर्गत ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलसोबतचा संघर्ष संपवण्याची जबाबदारी हमासवर टाकण्यात आली आहे. सोमवारी चीनसह 14 सदस्य देशांनी अमेरिकेच्या ठरावावर मतदान केलं. रशियानं मतदानात भाग घेतला नाही. यावेळी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याअंतर्गत गाझामध्ये तीन टप्प्यांचा शांतता प्रस्ताव लागू केला जाईल. यामध्ये कतार आणि इजिप्तचीही भूमिका असेल.
"आज, या परिषदेनं हमासला संदेश पाठवलाय, ज्यामध्ये युद्धविराम करार स्वीकारा असं स्पष्ट सांगण्यात आलंय", असं अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमा-ग्रीनफिल्ड यांनी मतदानानंतर संयुक्त राष्ट्रसंघातील मतदानानंतर सांगितलं. तसंच इस्रायलनं या करारासाठी आधीच सहमती दर्शविली आहे. जर हमासनंही तसं केलं तर आजची लढाई थांबू शकते. इजिप्त आणि कतार यांनी यूएसला आश्वासन दिलंय की ते हमाससोबत रचनात्मकपणे काम करत राहतील. हमासनं कराराचं पालन केलं असंल तर इस्त्रायलदेखील आपली जबाबदारी पूर्ण करेल याची, खात्री करण्यासाठी अमेरिका मदत करेल, असंही लिंडा थॉमा-ग्रीनफिल्ड म्हणाले.
चार ओलिसांची नाट्यमयरित्या सुटका-अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन इस्रायलला आल्यावर परिषदेत युद्धबंदीचा हा प्रस्ताव आला. इस्रायली युद्ध मंत्रिमंडळाचे विरोधी पक्षनेते बेनी गँट्झ यांनी रविवारी राजीनामा दिला. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ओलीसांना परत आणण्यावर आणि युद्ध संपवण्यापेक्षा त्यांच्या राजकीय हितांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. याआधी शनिवारी इस्रायली सैन्यानं गाझामधील हमासच्या ताब्यातील भागातून चार ओलीसांची नाट्यमयरीत्या सुटका केली.
36,000 हून अधिक पॅलेस्टिनी व्यक्तींचा मृत्यू-हमास-नियंत्रित गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 36,000 हून अधिक पॅलेस्टिनी व्यक्तींचा मृत्यू झाला. थॉमस-ग्रीनफिल्डच्या मते, सुरक्षा परिषदेनं मंजूर केलेली योजना सहा आठवड्यांच्या युद्धविरामानं सुरू होईल. यामध्ये इस्रायली कोठडीतून पॅलेस्टिनींच्या सुटकेच्या बदल्यात महिला, जखमी आणि वृद्धांसह इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल. त्यानंतर इस्रायलला गाझामधील लोकसंख्या असलेल्या भागातून आपलं सैन्य मागं घ्यावं लागेल. नागरिकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात गाझामधील इतर सर्व ओलीसांची सुटका आणि गाझामधून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार होईल. अंतिम टप्प्यात गाझासाठी पुनर्बांधणी योजनेची सुरुवात करण्यात येईल.
इस्रायलच्या स्वसंरक्षणासाठी अमेरिकेची वचनबद्धता अतूट-इस्रायलला धीर देत थॉमस-ग्रीनफिल्ड म्हणाले की, " अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, हमास यापुढं 7 ऑक्टोबरच्या घटनांची पुनरावृत्ती करण्यास सक्षम नाही. इस्रायलच्या स्वसंरक्षणासाठी अमेरिकेची वचनबद्धता अतूट आहे." तर रशियाचे स्थायी प्रतिनिधी वसिली नेबेन्झिया यांनी या प्रस्तावावर साशंकता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, "ही योजना किती यशस्वी होईल हे पाहणं बाकी आहे. मात्र, मॉस्कोला हे थांबवायचं नाही, कारण त्याला अरब देशांचा पाठिंबा आहे," असं ते म्हणाले.
हेही वाचा -
- इस्रायल गाझा युद्ध : रमजान काळात 'तत्काळ युद्धविराम' करण्याचा 'यूएन सुरक्षा परिषदे'चा ठराव - Israel Gaza War
- गाझामध्ये पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू
- संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटवर इस्रायलचा आक्षेप; राऊत म्हणाले यामागे नक्कीच राजकारण