ठाणे Vaibhav Kale dies in Hamas attack :इस्रायल-हमास युद्धात भारतीय सैन्यदलाचे निवृत्त कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव अनिल काळे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात 'संरक्षण समन्वय अधिकारी' म्हणून कार्यरत होते. कर्नल काळे हे सोमवारी सकाळी संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून रफाह येथील युरोपियन हॉस्पिटलमध्ये जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले.
काळे यांच्या कुटुंबाला धक्का : एका वृत्तसंस्थेशी बोलताना, वैभव काळे यांच्या काकू मुग्धा काळे म्हणाल्या, "वैभवला वीरमरण आलं, यावर माझा आत्ताही विश्वास बसत नाहीय. जेव्हा आम्ही वैभवबद्दल ऐकलं, तेव्हा खूप मोठा धक्का बसला. तोआता या जगात नाहीत, यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. अलीकडच्या काळात आम्ही त्याला फारसं पाहिलंही नव्हतं. मात्र, तो अजूनही आत्म्यानं आमच्यासोबत आहे, असं वाटतं. शेवटी कटू सत्य बाहेर आलं तरी आमचं मन ते स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळं आमच्यासाठी वैभव अजूनही जिवंत आहे.
- "वैभव लहानपणापासूनच खूप सक्रिय होता. त्याला नेहमी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. वैभव ध्येयप्राप्तीच्या बाबतीत खूप समर्पित होता. त्यांच्या आजोबांची इच्छा होती, की त्यानं सैन्यात भर्ती व्हावं. तो आपल्या आजोबांचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत सैन्यात कायम राहिला," अशी प्रतिक्रिया वैभव काळे यांचे चुलत बंधू चिन्मय काळे यांनी म्हटलं आहे.
- संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायमस्वरूपी मिशननं मंगळवारी त्यांच्या कुटुंबाप्रति शोक व्यक्त केलाय. भारताच्या स्थायी मिशनच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी लिहलंय. 'गाझामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा विभागासाठी काम करणारे कर्नल वैभव काळे यांच्या निधनामुळं आम्हाला दुःख झालं आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी काळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जागतिक संस्थेच्या निवेदनानुसार, वैभव काळे संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू होते. त्यांची एका महिन्यापूर्वी गाझात नियुक्ती करण्यात आली होती.