गाझा सिटी Firing on Crowd in Gaza : गाझा शहरात अन्न वितरणादरम्यान पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्यानं गुरुवारी हल्ला केल्यानं 100 हून अधिक लोक ठार झाले. यासह, सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धातील मृतांची संख्या आता 30 हजारांहून अधिक झालीय. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सैनिकांनी गोळीबार केल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी मान्य केलंय. "जमावाकडून धमक्या मिळाल्यानंतर सैनिकांनी गोळीबार केला," असं त्यांनी सांगितलं.
मोठ्या प्रमाणात उपासमारीचं संकट : 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गाझा शहर आणि संपूर्ण उत्तर गाझाला इस्रायली हवाई, समुद्र आणि जमीन हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आलंय. हे क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे आणि अनेक महिन्यांपासून या प्रदेशापासून तुटलेलं आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचली नाही. मदत करणाऱ्या गटांचं म्हणणं आहे की, "गाझाच्या बऱ्याच भागात मानवतावादी मदत पोहोचवणं जवळजवळ अशक्य झालं. गाझाच्या 2.3 दशलक्ष पॅलेस्टिनी लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकांना उपासमारीला सामोरं जावं लागत आहे," असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय.