अस्ताना : राजधानी बाकूहून रशियातील ग्रोझनीला जाणारं अझरबैजान एअरलाइन्सचं प्रवासी विमान बुधवारी पश्चिम कझाकस्तानमध्ये कोसळलं. कझाकच्या परिवहन मंत्रालयानं बुधवारी ही माहिती दिली.
"बाकू-ग्रोझनी मार्गावर जाणारं विमान अकताऊ शहराजवळ क्रॅश झालं. हे अझरबैजान एअरलाइन्सचं विमान आहे," असं तेथील परिवहन मंत्रालयानं टेलिग्रामवर स्पष्ट केलं. अझरबैजान एअरलाइन्सनं स्पष्ट केलं की, एम्ब्रेअर 190 ने कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील तेल आणि वायू केंद्र असलेल्या अकताऊपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर "इमर्जन्सी लँडिंग" करताना विमान कोसळलं.
कझाकच्या वाहतूक मंत्रालयानं सांगितले की, विमानात 62 प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. देशाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयानं सांगितलं की, त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी आग विझवत आहेत. यातील काही प्रवासी वाचले असल्याचं सांगण्यात येत आहे.