हैदराबाद Right Way To Eat Figs : अंजीर खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. अंजीरला सुपर फूड म्हणून देखील ओळखलं जातं. यामुळे शरीराला मॅंगनीज, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक अशी खनिजं मिळतात. तसंच अंजीरमध्ये फायबर आणि अॅंटिऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते. अंजीर खाल्ल्यानं मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील अंजीर उपयुक्त आहे. तसंच मधुमेहाच्या रुग्णांना देखील याचा फायदा होतो.
अंजीर खाण्याचे फायदे
उच्च रक्तदाब नियंत्रित करते : अंजीरमध्ये आढळणारा पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी आहारात अंजीरचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
पचनसंस्था निरोगी ठेवते : बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रस्त लोकांसाठी अंजीर एक प्रभावी स्रोत आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे आतड्याची हालचाल सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय अंजीर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासही मदत करते.
मधुमेहींसाठी फायदेशीर :मधुमेही रुग्णांच्या आहारात अंजीरचा समावेश करणं चांगलं आहे. अंजीर खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामध्ये आढळणारे ऍब्सिसिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि क्लोरोजेनिक ऍसिड सारखी संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.