महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक सर्प दिनी सापाविषयी जाणून घ्या आणि गैरसमज दूर करा - World Snake Day 2024

World Snake Day 2024 :दरवर्षी 16 जुलै हा दिवस जगभरात सर्प दिन म्हणून साजरा केला जातो. सापांविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि निसर्गाच्या संतुलनात असलेलं सापाचं महत्तव लोकापर्यंत पोहोचावं या हेतूनं हा दिवस साजरा केला जात आहे.

World Snake Day 2024
जागतिक सर्प दिन (World Snake Day File photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 2:58 PM IST

World Snake Day 2024 : सापांना आपल्या समाजात कायम वाईट वागणूक मिळत आली आहे. नागपंचमी सारख्या सणाला सापांची पूजा करण्याची प्रथा असली तरीही इतर वेळा साप दिसला की त्याची हत्या करण्याची वृत्ती बळावली आहे. भारतात केवळ पाच प्रकारचे साप हे विषारी असतात बाकीचे सर्व साप बिनविषारी असतानाही त्यांच्या बद्दलच्या गैरसमजातून त्यांना मारुन टाकले जाते. खरंतर साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं मानलं जात असतानाही हे हत्यासत्र अखंडपणे सुरूच आहे. सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी दरवर्षी 16 जुलै हा दिवस जगभरात साजरा केला जातो. साप हा एक असा प्राणी आहे ज्याच्याबद्दल सर्वत्र गैरसमज आहेत. लोकांना सापांच्या प्रजातींची माहिती देण्याच्या हेतूनं हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक सर्प दिनाविषयी जाणून घ्या

जगभरातील सापांच्या विविध प्रजातींबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी जागतिक सर्प दिन हा महत्त्वाचा दिवस आहे. बरेच लोक सापांना घाबरतात आणि अर्थातच, याची कारणे आपण निश्चितपणे समजू शकतो! सर्पदंशाचा विचार कोणालाच आवडत नाही. अनेकदा सापांना नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. असं असलं तरी साप हा महत्त्वाचा प्राणी आहे आणि आपण राहत असलेल्या जगासाठी ते खूप महत्वाचे आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. सापांच्या प्रजाती निसर्गाचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. साप शेतातील पिकांचे नुकसान करणारे किटक खाऊन जगतात. याशिवाय, पिकांची नासाडी करणारे उंदीरही साप खातात. आपल्या पिकांचं, धान्याचं रक्षण व्हावं यासाठी जगातील अनेक शेतकरी सापांना आपले मित्र मानतात आणि त्यांना अभय देतात.

सापाविषयीचे गैरसमज दूर करणं आवश्यक

साप दिसताच त्याला मारुन टाकण्याची कृती थांबली पाहिजे. यासाठी समाजाच्या सर्व थरात जागृती होणं गरजेचं आहे. मानवी वस्तीत जेव्हा साप येतो तेव्हा त्याला मारण्यात पुरुषार्थ मसजणारे तरुण आहेत. पण तसं न करता आपल्या शहरातील सर्प मित्रांना बोलावून घेऊन तो साप पकडून दूरवर सुरक्षित ठिकाणी सोडून देणं आवश्यक आहे. सापाबद्दलचे अनेक गैरसमज आहेत. यामध्ये साप डूक धरतो, बदला घेतो हा पूर्णतः गैरसमज आहे. विशेष म्हणजे सापाला कान असतं नाहीत. सापाकडे स्मरण शक्ती असत नाही त्यामुळे बदला घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साप किटक, बेडूक, उंदीर खाऊन जगतो. दूध हे त्याचं अन्न असत नाही. त्यामुळे साप दूध पितो हा देखील एक गैरसमज आहे. आज सर्प दिनाच्या निमित्तानं सापांविषयी अधिक शास्त्रीय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला पाहिजे व सापा विषयीचे अज्ञान दूर केले पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details