Vitamin D for Child Growth: आपल्याला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात व्हिटॅमिन ‘डी’ला विशेष स्थान आहे. मुख्यत्वे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे. केवळ प्रौढच नाही, तर लहान मुलांसाठी ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक आहे. मुलांच्या वाढीसोबतच हाडं मजबूत ठेवण्याकरिता व्हिटॅमिन डी फार महत्त्वाची भूमिका बजावते, असं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झालंय.
संशोधन काय म्हणते:खेळताना लहान मुलांना मार लागणं ही एक सामान्य बाब आहे. मार लागल्यामुळे प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसते. परंतु मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास जखम लवकर बरी होत नाही. जखम ठीक होण्यासाठी बराच काळ लागतो, अशी बाब अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स नॅशनलने केलेल्या एका अभ्यासात समोर आली आहे. संशोधकांनी 186 जखमी मुलांची तपासणी केली. त्यानंतर रेडियोग्राफिक निष्कर्षांशी तुलना करण्यात आली. यात मुलांच्या वाढीसाठी तसंच हाडं मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे मुलांना दररोज पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी ची मात्रा देणे गरजेचं आहे. हे पालकांनी लक्षात ठेवावं.