Weight Loss Tips: बदलत्या जीवनशैलीमध्ये वजन वाढणं ही एक मोठी समस्या होत चालली आहे. खाण्याची अयोग्य सवय, तणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव, यामुळं अनेकांचं वजन वाढत आहे. परिणामी तरुण वयातच आरोग्यासंबंधित विविध समस्यांना समोरं जावं लागतं. प्रत्येक जण अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतो. याकरिता पोषक आहासोबतच वर्कआऊट देखील करतात. परंतु, हवा तसा परिणाम मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे काय? वजन कमी करायचं असेल तर आहारासोबतच नियमित वजन मोजण्याची देखील गरज आहे. चला तर जाणून घेऊया तज्ञांच्या मते वजन कमी करताना चांगले परिणाम मिळविण्यासाठी हप्त्यातून किती वेळा वजन मोजावं?
अभ्यास काय म्हणतो:फ्लोरिडा युनिव्हर्सिटी आणि व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं एक संशोधन करण्यात आलं. वजन कमी करण्यासाठी वजन तपासणं किती गरजेचं आहे. या विषयावर हा अभ्यास केला आहे. यावेळी, जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ असलेल्या 74 लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. तीन महिने वजन कमी करण्याच्या योजनेचे अनुसरण करताना आणि नंतर नऊ महिने ते वजन राखण्याचा प्रयत्न करताना त्यांचं निरीक्षण करण्यात आलं.
या संशोधनादरम्यान काही प्रमुख मुद्दे समोर आले. विशेषत: जे आहाराचे नियम पाळतात, व्यायाम करतात आणि आठवड्यातून तीन दिवस वजन तपासतात त्यांचं वजन वाढत नाही. नियमित वजन तपासणाऱ्या व्यक्तींचं वजन कमी झाल्याचं आढळलं. त्याचबरोबर ज्यांनी आठवड्यातून फक्त एक किंवा दोन दिवस वजन तपासलं त्यांचं वजन पुन्हा वाढलं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर आहार आणि व्यायाम करुन चालणार नाही, तर नियमित वजन तपासणंही महत्त्वाचं आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे.