हैदराबाद Holika Dahan Muhurat 2024: आजपासून देशभरात रंगांचा सण होळीची सुरुवात होळी दहनानं होणार आहे. यावेळी होळी दहन रात्री 11.14 ते 12.14 पर्यंत अतिशय शुभ असेल. त्याच वेळी, गर्भवती महिला आणि नववधूंसाठी होळी दहन पाहणं अशुभ असणार आहे. काशीचे पंडित दैवज्ञ कृष्ण शास्त्री यांच्या माहितीनुसार आज भद्रा सकाळी 9.56 ते रात्री 11.14 पर्यंत असेल. भद्रानंतर शुभ मुहूर्तावर (सर्वार्थसिद्धी योग) होळी दहन करणं शुभ ठरेल. होळी दहनासाठी रात्री 11.14 ते 12.14 ही वेळ अत्यंत शुभ आहे. होळी (धुलीवंदन) हा सण 25 मार्च म्हणजेच सोमवारी साजरा केला जाणार आहे.
गरोदर स्त्रिया, नवविवाहित स्त्रिया आणि लहान मुलांनी होळी दहन पाहू नये :असं मानलं जातं की गर्भवती महिलेनं होळी दहन पाहिल्यास तिच्यावर आणि जन्मलेल्या बाळावर अशुभ प्रभाव पडतो. त्यामुळं तिनं होळी दहन पाहू नये. तसंच नवविवाहित वधूनं होळी दहन पाहिल्यास तिच्या वैवाहिक जीवनावर अशुभ परिणाम होतो. या कारणास्तव त्यांनी होळी दहनापासूनही दूर राहावं. सासू आणि सुनेनं सोबत होळी दहन एकत्र पाहू नये, असाही समज आहे. त्यामुळं त्यांच्यातील प्रेम कमी होतं. ज्यांना एकुलता एक मुलगा आहे, त्यांनीही होळी दहन पाहू नये. ज्येष्ठांनी त्यांच्या जागी पूजा करावी. नवजात बालकं आणि लहान मुलांनाही होळीकाजवळ नेऊ नये. होळी दहन दरम्यान नकारात्मक शक्तींचा धोका असतो, त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. हे टाळले पाहिजे, अशी धारणा आहे.