हैदराबाद Labour Day 2024 : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी साजरा होत असतो. या दोन्ही दिवसांच्या मागचा इतिहास जरी वेगळा असला तरी या दिवसामध्ये एक साम्य आहे, अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याचं, हक्कासाठी संघर्ष उभारण्याचं आणि प्रसंगी बलीदानाचीही पर्वा न करता इतिहास रचण्याचं! मराठी भाषिकांवर होऊ घातलेला अन्यायकारक राज्य स्थापनेचा घाट राज्यातील कष्टकरी कामगारांनी उधळून लावला आणि महाराष्ट्राची स्थापना केली. यासाठी 106 हुतात्मांनी आपले प्राण अर्पण केले. यात आघाडीवर होता तो मुंबईचा गिरणी कामगार. आपल्या विरोधात होणाऱ्या हक्कांची जाणीव झालेल्या या संघटीत कामगारांनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात निर्णायक भूमिका बजावली. या कामगारांनी केलेल्या लढ्याच्या नेतृत्वाची मूळची प्रेरणा जागतिक कामगार चळवळीतून मिळालेली होती. त्यामुळे या दोन्ही लढ्यांचा गौरवशाली इतिहास समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन :1 मे हा दिवस जगभर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातील कामगार चांगल्या कामाच्या परिस्थिती आणि अधिकारांसाठी एकत्र येऊ लागले. 1 मे 1886 रोजी कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या मागणीसाठी शिकागोतील कामगार रस्त्यावर उतरले. हेमार्केट स्क्वेअरमध्ये श्रमिक रॅलीदरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर शांततापूर्ण निदर्शन सुरू असताना त्याला हिंसक वळण मिळालं. परिणामी पोलीस अधिकारी आणि आंदोलक दोघेही जखमी झाले. कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या या आंदोलनानं जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली.
कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठीचा प्रखर लढा :जगभरातील कामगार चळवळीने 'जगातील कामगारांनो एक व्हा' अशी हाक दिली आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळत गेला. भांडवलदार वर्गाकडून नफा कमवण्याच्या हेतूनं होणारं कामगारांच्या श्रमाचं शोषण, कामाचे निश्चित तास नसणे, आठवड्याची सुट्टी, किमान वेतन कायदे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियम आणि सामूहिक सौदेबाजीचा अधिकार यासारख्या अन्याय कारक गोष्टींवर कामगार वर्गाची एकी वाढत गेली.
कामगार दिनाची घोषणा :1889 मध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वत्र कामगारांशी एकता प्रदर्शित करण्यासाठी 1 मे हा अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित करण्यात आला. तेव्हापासून मे दिवस हा कामगार चळवळीतील यश साजरे करण्याचा आणि कामगारांच्या हक्कांचं समर्थन करणारा दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो.
भारतीय स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना :१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्याची स्थापना करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागल्यानंतर गुजराती भाषिकांना स्वतःच वेगळं राज्य असावं असं वाटत होतं. त्याच दरम्यान मराठी भाषिकही महाराष्ट्र राज्याची निर्मितीची मागणी करत होते. या काळात मुंबईतील काही गुजरात धार्जिण्या नेत्यांनी मुंबई शहर गुजरात राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला आणि मुंबईसह महाराष्ट्राची निर्मितीची मागणी जोर धरु लागली. त्यावेळी मराठी भाषा बोलणारे लोक गुजरातमधील डांग आणि उंबरगाव भागातही होते, तसे ते कर्नाटकाच्या सीमेवरही होते. त्यामुळे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीनं उचल खाल्ली आणि संयुक्त महाराष्ट्राचा एक मोठा लढा उभा राहिला.