महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मानवी मनं आणि नात्यातलं पदर उलगडणारी गूढ हळवी कथा, 'द रॅबीट हाऊस' प्रदर्शनासाठी सज्ज - THE RABBIT HOUSE RELEASE DATE

सुनिता पांढरे निर्मित आणि वैभव कुलकर्णी दिग्दर्शित 'द रॅबीट हाऊस' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही आशयपूर्ण कथा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.

The Rabbit House
द रॅबीट हाऊस (The Rabbit House poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2024, 8:07 PM IST

मुंबई - भारतासारख्या देशात लग्न जुळवण्यासाठी 'अरेंज मॅरेज' ही पद्धत प्रचलीत आहे आणि वर्षानुवर्षे चालत आली आहे. यातून लग्न जुळतात आणि दोन भिन्न स्वभावाचे लोक एकमेकांना परिचीत होतात. यातील प्रत्येकाची जडणघडण, संस्कार भिन्न असू शकतात. आपल्याकडे वधू वराची गुण जुळवण्याची पारंपरिक पद्धत असली तरी ते अचूक असतेच असं नाही. तर अशाच लग्नानंतरची कथा 'द रॅबीट हाऊस' या चित्रपटामध्ये घडते.

हिमाचल प्रदेशातील पहाडी भागात असलेल्या 'रॅबीट हाऊस' या होम स्टे घरामध्ये हे जोडपं दाखल होतं. एकमेकांना अजूनही अनोळखी असणारं हे नवदांपत्य मनात अनेक स्वप्नं घेऊन आलं आहे. यातील नवविवाहित पत्नीला पतीचा स्वभाव जसजसा कळत जातो तसा तिच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं तिला कळून चुकतं. चमत्कारिकपणे वागणारा, तापट नवरा आपल्या पदरी पडलाय आणि याच्याशी जन्मभर जुळवून घ्यावं लागणारा हा तिला बसलेला एक मोठा धक्का आहे. गुंतागुंतीचं मानवी मनं आणि स्वभावाची, नात्यातलं पदर उलगडणारी एक हळवी आणि गूढ कथा 'द रॅबिट हाऊस' चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'द रॅबीट हाऊस' हा हिंदी भाषेतील चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2025 रोजी देशभर थिएटरमध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्यांवर, रेडिओसह इतर प्रसार माध्यामांवर यातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते चित्रपट पाहण्याचं आवाहन करताना दिसतात. मराठमोळा दिग्दर्शक वैभव कुलकर्णी यांचा हा पहिलाच हिंदी पदार्पणाचा चित्रपट आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरुनच एका अनोख्या विषयावरचा चित्रपट असल्याचं जाणवतं.

'द रॅबीट हाऊस' चे दिग्दर्शक वैभव कुलकर्णींशी ईटीव्ही भारतनं संवाद साधला असता त्यांनी या चित्रपटाच्या कथानकाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. या चित्रपटाची कथा कशी सूचली याबद्दल विचारलं असता कुलकर्णी म्हणाले, "आमचे डीओपी प्रतीक पाठक हे हिमाचलमध्ये पर्यटनासाठी गेले असताना त्यांना हे 'रॅबीट हाऊस' दिसलं. त्यांनी मला या अनोख्या घराबद्दल सांगितलं. आपण कुठं प्रवेश केलाय आणि कुठं पोहोचलोय याचा थांगपत्ता लागत नाही. हे ऐकल्यानंतर मला एक कथा सूचली आणि ती विकसीत केली. एक दर्जेदार कथा तयार झाल्याचं जाणवल्यानंतर आम्ही याच्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. आमचे निर्माता कृष्णा पांढरे आणि सुनिता पांढरे यांना हे कथानक ऐकवल्यानंतर त्यांना ते खूप आवडलं आणि आम्हाला चित्रपटासाठी हिरवा कंदील मिळाला. आम्ही जेव्हा पहिल्यांदा रेकीसाठी हिमाचलमध्ये गेलो तेव्हा मी लिहिल्या प्रमाणंच हे घर होतं. ही एक मानवी नात्याची, मानसशास्त्रीय आणि थोडीशी गूढ रंजक कथा आहे. आजच्या मारधाडीच्या चित्रपटांच्या भाऊ गर्दीत एक दर्जेदार आशय असलेली ही कथा प्रेक्षकांना आवडेल याची खात्री वाटते. त्यामुळं 3 जानेवारीला प्रेक्षकांनी आवर्जुन हा चित्रपट त्यांच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पाहावा."

'द रॅबीट हाऊस' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्याला खूप कमी वेळात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. यूट्यूबवर याच्या ट्रेलरला 10 लाखाहून अधिक व्यूव्ह्ज मिळाले आहेत. नवीन वर्षात एका उत्तम कलाकृतीचा आनंद घेण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना मिळणार आहे.

गीताई प्रॉडक्शन्स निर्मिती "द रॅबिट हाऊस" या हिंदी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन वैभव कुलकर्णी यांचे असून त्यांनी चित्रपटाचे संकलन सुद्धा केले आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हिमाचल प्रदेश येथे झाले असून तेथे द रॅबिट हाऊस हे 120 वर्षे जुने घर आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या वैशिष्ट्यांचा वापर या चित्रपटाच्या कथेमध्ये केला आहे. ही वास्तू होम स्टे साठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटात पद्मनाभ, अमित रियान, करिष्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पद्मनाभ याने गायक, संगीतकार आणि अभिनय अशी तिहेरी कामगिरी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details