मुंबई - सनी देओलच्या 'बॉर्डर' या ब्लॉकबस्टर चित्रपटानं 1997 साल गाजवलं होतं. या चित्रपटाचा सीक्वेल येईल याची प्रेक्षकांनी खूप काळापासून इच्छा बाळगली आहे. तब्बल 27 वर्षानंतर 'बॉर्डर 2' चित्रपट येणार हे निश्चित झालं आहे. आता या बहुप्रतिक्षित सिक्वेल 'बॉर्डर 2' चं अधिकृतपणे शूटिंग सुरू झालं आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच सनी देओलनं 'बॉर्डर'मध्ये तो पुन्हा आपल्या भूमिकेत परतणार असल्याचं जाहीर केलं होतं. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अभिनीत 'बॉर्डर 2' चित्रपटाच्या शूटिंगची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.
24 डिसेंबर रोजी निर्मात्यांनी 'बॉर्डर 2' च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना सांगितलं की, चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. हे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, "सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची सुरुवात सिनेसृष्टीतील दिग्गज भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली आहे. हा चित्रपट म्हणजे आजवर कधीही न पाहिलेली भव्य देशभक्तीपर कलाकृती असेल. तुमच्या कॅलेंडरवर नोंद करुन ठेवा 'बॉर्डर 2' 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल."