मुंबई - कॉमेडियन अभिनेता सुनील पाल एका शोसाठी मुंबईतून निघाल्यानंतर तो काही तास बेपत्ता झाला होता. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्यानं त्याच्या पत्नीनं ३ डिसेंबर रोजी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सुनिल गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. काही तासांच्या अनेक नाट्यानंतर सुनिल पाल सुखरुप असल्याचं समजलं आहे. आज ४ डिसेंबर रोजी तो मुंबईत परतणार आहे.
"कॉमेडियन सुनील पाल मुंबईबाहेर एका शोमध्ये सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाला आहे. त्याच्या पत्नीनं त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्यानं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. सुनीलला आज घरी परतणे अपेक्षित होतं, पण तो आला नाही आणि त्याचा फोनही संपर्कात नाही. पोलीस परिस्थितीचा तपास करत आहेत, शो आणि त्याच्या संपर्कांबद्दल तपशील गोळा करत आहेत.", अशी बातमी आयएनएस या वृत्त संस्थेनं दिल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
मंगळवारी 3 डिसेंबर रोजी सुनील पाल बेपत्ता झाल्याच्या बातमीनं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर काही तासांनी सुनीलनं आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घरी परतत असल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सुनिलनं मंगळवारी संध्याकाळी उशिरा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पोलिसांशीही त्याचं बोलणं झालं आहे. सुनील पाल घरी परतल्यानंतर मुंबई पोलिस त्याची चौकशी करणार आहेत.
पापाराझी विरल भयानी यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या टीमनं सुनील पाल यांची पत्नी सरिता यांच्याशी संपर्क साधला. सरिता यांनी मेसेज पाठवून सुनिल सुखरुप असल्याचं कळवलं आहे. सुनिलचं पोलिसांशीही बोलणं झाल्याचं त्याच्या पत्नीनं मेसेजमध्ये म्हटलंय.
बातम्यांनुसार, सुनील पाल एका शोसाठी मुंबईबाहेर गेला होता आणि 3 डिसेंबरला घरी परतणार होता. परंतु, तो परत न आल्यानं पत्नी चिंतेत पडली आणि तिनं त्याच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्यानं पत्नी सरितानं सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये सुनिल पाल हरवल्याची तक्रार दाखल केली होती.