मुंबई - Sanjay Kapoor : अभिनेता अनिल कपूर आणि बोनी कपूर यांचा भाऊ संजय कपूरनं अलीकडेच आपल्या करिअरमधील संघर्षांबद्दल खुलेपणानं सांगितलं आहे. अनिल कपूर अभिनीत आणि बोनी कपूर निर्मित 'नो एंट्री'बद्दल संजयनं एक वक्तव्य केलं आहे. 'नो एंट्री' चित्रपटाबद्दल बोलताना त्यानं म्हटलं की, त्याच्या वाईट काळात भावांनीही त्याची मदत केली नाही. "जेव्हा मी कठीण काळातून जात होतो, तेव्हा माझा भाऊ बोनीनं मला कास्ट केले नाही. 'नो एंट्री' चित्रपटात माझ्याऐवजी फरदीन खानला घेतले. अनिल कपूर आणि सलमान खान आधीच कलाकार होते, त्यामुळे चित्रपट कसाही चालणार होता. मला कास्ट केलं असतं तरी फारसा बदल झाला नसता. गोष्टी जशा घडल्या तशाच राहिल्या असत्या आणि 'नो एंट्री' ब्लॉकबस्टर ठरली असती."
संजय कपूरची मुलाखत :संजय कपूर पुढं सांगितलं, "फरदीनला घेतल्याचं कारण हे आहे की, यावेळी तो माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय होता. मी माझ्या भावाच्या प्रॉडक्शनमध्ये गेल्या 20 वर्षांत काम केलेलं नाही. जेव्हा मी चित्रपटांची निर्मिती करत होतो आणि या वाईट टप्प्यातून जात होतो, तेव्हा ते माझ्यावर प्रेम करतचं होते. शेवटी हा व्यवसाय आहे." नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेरी ख्रिसमस'मध्ये संजय कपूर दिसला होता. या चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते. याशिवाय तो 'मर्डर मुबारक'मध्ये सारा अली खान, विजय वर्मा आणि पंकज त्रिपाठीबरोबर झळकला होता. या चित्रपटामधील त्याचा अभिनय अनेकांना आवडला होता.