मुंबई :सलमान खान याच्या एका चित्रपटाचं दादरला शूटींग सुरू असताना सुरक्षा रक्षक आणि सलमान खानच्या फॅनमध्ये राडा झाला. यावेळी सलमानच्या फॅननं लॉरेन्स बिश्नोई को बुलाऊ क्या, अशी धमकी दिल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ मुंबई पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत सलमान खान याच्या फॅनला ताब्यात घेतलं. त्यामुळे शूटींग करताना सगळ्यांची पाचावर धारण बसली. चित्रपट अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. मात्र सलमान खानच्या फॅननंच लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं धमकी दिल्यानं बॉलिवूडचा भाईजानही चांगलाच हादरला.
शूटींग पाहण्यास सुरक्षा रक्षकानं रोखल्यानं फॅननं दिली धमकी :दबंग अभिनेता सलमान खान याच्या आगामी चित्रपटाचं शूटींग मुंबईतील दादर परिसरात सुरू होतं. यावेळी सलमान खानच्या एका फॅनला सुरक्षा रक्षकानं शूटींग पाहताना रोखलं. त्यामुळे संतापलेल्या फॅननं सुरक्षा रक्षकांसोबत वाद घातला. यावेळी झालेल्या भांडणात सलमान खानच्या फॅननं लॉरेन्स बिश्नोई को बुलाऊ क्या, अशी धमकी सुरक्षा रक्षकांना दिली. त्यामुळे शूटींगच्या लोकेशनवर मोठी खळबळ उडाली. सुरक्षा रक्षांची मोठी धावाधाव झाली. त्यांनी तत्काळ मुंबई पोलिसांना या धमकीची माहिती दिली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सलमान खानच्या फॅनला ताब्यात घेतलं.