मुंबई -बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला झाल्यानंतर आता त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. त्याच्या वांद्रे येथील घरात चोर घुसल्याचं प्राथमिक चौकशीत पुढं आलं होतं. त्याच्यावर झालेला हल्ला गंभीर असून दोन वार खोलवर शरिरात घुसले आहेत. त्यामुळे अद्याप त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांनी अंतिम भाष्य केलेलं नाही. दरम्यान, या हल्ल्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.
सैफवरील हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धक्का :सैफ अलीच्या पाठीवर दुखापत झाली आहे. या हल्ल्याच्या प्रसंगी करीना कपूर खान आणि तिची मुलं तैमूर आणि जेह यांच्यासह संपूर्ण कुटुंब घरी होतं. अभिनेता सैफ अली खाननं आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी चोरांचा सामना केला असल्याचं, करीनाच्या टीमकडून असं सांगण्यात आलं आहे. करीना आणि तिची दोन्ही मुलं सुरक्षित आहेत. सैफवरील या हल्ल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. याप्रकाराबद्दल अभिनेत्री पूजा भट्टनं म्हटलं की, "आम्ही आता सुरक्षित नाही." सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला झाल्याची बातमी ऐकल्यानंतर, ज्युनियर एनटीआर यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिलंय, "सैफ सरांवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झालं. त्यांना लवकर बरं होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना."
सैफच्या टीम केलं निवेदन जारी :या दुर्दैवी घटनेला प्रतिसाद देताना, सैफच्या टीमनं एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये लिहिलं गेलं, "सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो."
सैफच्या टीमचं लेटेस्ट अपडेट : सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पार पडली असून आता तो धोक्यातून बाहेर आला आहे. तो सध्या बरा आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. मुंबई पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. डॉ. निरज उत्तमणी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील टीमचं सैफ अली खानच्या टीमनं आभार मानले आहेत. या काळात प्रार्थना आणि विचारना कारणाऱ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
पोलिसांनी दिली घटनेबद्दल माहिती :वांद्रे डीसीपी यांनी याप्रकरणी म्हटलं, "हे खरे आहे, एक अज्ञात व्यक्ती पहाटे सैफ अली खानच्या घरात घुसला. यादरम्यान एका चोरानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला. यानंतर, त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफवर या हाणामारीत चाकूनं वार करण्यात आले."
लीलावती रुग्णालयात कधी केलं दाखल : लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी याप्रकरणी सांगितलं की, "सैफ अली खानला जखमी परिस्थितीत पहाटे 3:30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. त्याला सहा ठिकाणी दुखापत झाली आहे, त्यापैकी दोन गंभीर आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ आणि एक मानेवर झाली आहे. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांनी सकाळी 5.30 वाजता त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू केली आहे." आता सैफची प्रकृती कशी आहे, हे या शस्त्रक्रियेनंतरच समजेल. वांद्रे पोलिसांनी सध्या आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. घराभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
हेही वाचा :
- सैफ अली खानवर घरात घुसलेल्या चोराकडून वार, रुग्णालयात उपचार सुरू
- करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह पापाराझीवर संतापला, व्हिडिओ व्हायरल - kareena kapoor
- मुंबईच्या रस्त्यावर दिसला सैफ अली खानचा 'नवाबी' थाट, घोडागाडीतून केली सैर - Saif Ali Khan