मुंबई - साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'वेट्टियाँन' हा अॅक्शन ड्रामा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तब्बल 33 वर्षांनंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले आहेत. या दोन्ही सुपरस्टारचे चाहते 'वेट्टियाँन'ची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. 10 ऑक्टोबरला 'वेट्टियाँन' प्रदर्शित होत आहे. यापूर्वी रजनीकांतनं आपल्या सहकारी सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. अमिताभ यांच्यावर गुदरलेल्या आर्थिक प्रसंगाची आठवण रजनीकांतनं सांगितली आहे.
रजनीकांत यांनी 'वेट्टियाँन' चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खुलासा केला. रजनीकांत म्हणाले की, करिअरच्या शिखरावर असताना अमिताभ यांना सर्व काही सोडून दूर ठिकाणी निवांतपणे स्थायिक व्हायचं होतं. याच काळात त्यांनी एबीसीएल ही कंपनी स्थापन केली आणि आणि दुर्दैवानं त्यांची ही चित्रपट निर्मिती संस्था दिवाळखोरीत निघाली. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे त्यांना त्यांचा जुहूतील बंगला तसेच त्यांची मुंबईतील मालमत्ता विकावी लागली. पण अमिताभ बच्चन यांच्यावर आलेल्या या संकटामुळे चित्रपटसृष्टीतील काही लोक खूश होते, पण त्यांना हे सुख फार काळ लाभलं नाही. अमिताभ बच्चन यांनी 18-18 तासात काम केलं आणि कर्जाची परतफेड केली.