मुंबई - 'द रोशन्स' या माहितीपट मालिकेचा बहुप्रतिक्षित ट्रेलर गुरुवारी अनावरण करण्यात आला. या कार्यक्रमात हृतिक रोशन, राकेश रोशन, राजेश रोशन आणि नेटफ्लिक्सच्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल उपस्थित होते. शशी रंजन दिग्दर्शित या मालिकेत रोशन कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीवरील त्यांच्या प्रभावाचा साग्रसंगीत आढावा घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमात, हृतिकनं सुपरस्टार रजनीकांतबरोरॉबर केलेल्या कामाची आठवण सांगितली. तो प्रेमानं त्यांना रजनी अंकल म्हणत असे. 1980 मध्ये त्याचे आजोबा जे ओमप्रकाश यांनी 'भगवान दादा' हा चित्रपट बनवला होता. यामध्ये रजनीकांत यांनी काम केलं होतं आणि हृतिक रोशन यात बालकलाकार म्हणून सामील झाला होता. त्यावेळी त्याला रजनीकांत यांच्या महानतेची कल्पना नव्हती.
"मला कल्पनाही नव्हती की मी एका महान दिग्गजाबरोबर उभा आहे. माझ्यासाठी ते रजनी काका होते. मी त्यांच्याशी 'हो, नाही' असं बोलत असे... मी माझ्या पद्धतीनं त्यांच्याशी वागत असे. ते खूप साधे, सौम्य आणि दयाळू व्यक्ती होते. जेव्हा मी शॉटमध्ये चूक करत असे तेव्हा माझे अजोबा तो शॉट कट करत असत. मात्र रजनी सर त्यांना थांबवत आणि ही माझ्यामुळे चूक झाली म्हणून पुन्हा शॉट घ्यायला लावत. मला चुकीची जाणीव होऊ नये यासाठी ते माझ्या चुकीचा दोष आपल्यावर घेत असत.", असं हृतिक म्हणाला.
'भगवान दादा' हा एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट होता. यामध्ये रजनीकांत, राकेश रोशन आणि दिवंगत श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका होत्या. 'कहो ना... प्यार है' (२०००) या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण करण्यापूर्वी, हृतिकनं बाल कलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'आशा' आणि 'आप के दिवाने' या चित्रपटांचा समावेश आहे.
'द रोशन्स' या माहितीपटाचं दिग्दर्शन शशी रंजन यांनी केलं आहे. रंजन यांनी राकेश रोशनसह या डॉक्यु-सिरीजची सह-निर्मिती देखील केली आहे. १७ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर हा प्रीमियर होणार आहे.