मुंबई - Qatra Qatra Song OUT : सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपट हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून सारा पहिल्यादा देशभक्तीपर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप उत्सुक आहे. 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान 'ए वतन मेरे वतन' चित्रपटातील 'कतरा कतरा' गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सुखविंदर सिंग यांनी गायलं आहे. याशिवाय या गाण्याला राघव शर्मा यांनी लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. 'ए वतन मेरे वतन'मधील 'कतरा कतरा' ट्रॅक प्रथम गोव्यातील 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शित करण्यात आलं होतं.
सुखविंदर सिंगनं दिला लाइव्ह परफॉर्मन्स : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावेळी सुखविंदर सिंगनं जबरदस्त लाइव्ह परफॉर्मन्स दिला होता. हा दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक कन्नन अय्यर, मुख्य अभिनेत्री सारा अली खान आणि चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. देशभक्तीवर आधारित हे गाणं समर्पण, निष्ठा आणि आदराची भावना जागृत करते. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारत छोडो आंदोलन (1942) दरम्यान गायब झालेल्या वीरांच्या भावना आणि समर्पणाचे सुंदरपणे सादरीकरण या गाण्यात करण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना गायक सुखविंदर सिंग सांगितलं की, ''कतरा कतरा'ला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, हे गाणं केवळ देशभक्ती आणि अभिमानाची भावनाच जागृत करत नाही तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भावना आणि शक्ती देखील यात सामील आहे. पुढं त्यांनी म्हटलं, ''ए वतन मेरे वतन'शी जोडून मला खूप आनंद होत आहे, ही एक अनोखी कहाणी आहे जी तरुणांच्या आवाजाच्या सामर्थ्याची झलक देते.''