मुंबई - Nana Patekar : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता नाना पाटेकर हे गेल्या अनेक वर्षापासून हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रात आणि नाट्यभूमीवर विविध दर्जेदार भूमिका करत आहेत. नाना पाटेकर यांच्यामध्ये एक सुंदर कवी आणि गीतकार सुद्धा दडलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'नाना छंद' गीतांचा अल्बम हा मुंबई एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला आहे. 'कैसे बताऊ मैं, तुम्हे तुम मेरे लिए कौन हो?' नाना पाटेकर यांच्या एका हिंदी चित्रपटातील हा संवाद खूप लोकप्रिय झाला आहे. नाना पाटेकर पडद्यावर भूमिका साकारताना अनेकदा अत्यंत संवेदनशील असल्याचं आपण पाहतो. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये संवाद फेक करताना छोट्या छोट्या कविता अथवा शायरी केल्याचं आपण पाहिलं आहे.
'नाना छंद' अल्बम लॉन्च :नाना पाटेकर यांनी विविध भूमिका पडद्यावर करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाना पाटेकर यांच्यामध्ये एक कवी आणि सृजनशील गीतकार दडला आहे हे नुकतेच समोर आलं आहे. सागरीका म्यूझिकद्वारे नाना पाटेकर यांनी लिहिलेल्या 'नाना छंद' या तीन गीतांच्या अल्बमचं अनावरण मुंबईत करण्यात आलं. सागरीका म्यूझिकला 25 वर्ष झाल्या निमित्तानं हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. नाना पाटेकर यांनी लिहिलेल्या गीतांना वैशाली सामंत स्वप्निल बांदोडकर आणि राहुल देशपांडे यांनी गायलं आहे तर निलेश मोहरीर यांनी याला संगीत दिलय. 'गंध तुझ्या पावलांचा हिरवा हळवा आणि दहिवर' या अल्बममध्ये ही तीन गीतं आहेत. या गीतांचं लेखन नाना पाटेकर यांनी केलय. या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर अभिनेता सचिन पिळगावकर, गायक सुदेश भोसले यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.