मुंबई - Mrunal Thakur: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर आज, 1 ऑगस्ट रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. मृणालनं बॉलिवूडपेक्षा जास्त साऊथमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मृणालनं अनेक हिट टीव्ही शोमध्येही काम केलं होतं. दरम्यान मृणालकडे अनेक साऊथ चित्रपटांमधील ऑफर्स आहेत. तिन याआधी प्रभास स्टारर 'कल्कि 2898 एडी'मध्ये कॅमियो केला होता. यामधील तिचा अभिनय अनेकांना आवडला होता. आज मृणालच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही कदाचित आधी ऐकल्या, वाचल्या नसतील.
मृणाल ठाकूरचा वाढदिवस : मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. तिनं 2012 मध्ये 'मुझसे कुछ कहती...ये खामोशियां' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, मात्र तिला पाहिजे तशी ओळख मिळाली नाही. यानंतर तिन झी टीव्हीच्या 'कुमकुम भाग्य' या हिट शोमध्ये काम केलं. या शोनंतर ती प्रसिद्धीझोतात आली. टीव्हीच्या दुनियेत प्रसिद्ध झाल्यानंतर मृणाल चित्रपटांकडे वळली. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी तिनं खूप संघर्ष केला. आजही तिचा संघर्ष सुरूच आहे. मृणालनं स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सुरुवातीला ती अनेकदा निराश होऊन रडली आहे.