मुंबई The Family Man 3 : कृष्णा डीके आणि राज निडिमोरी यांची सुपरहिट वेब सीरीज 'द फॅमिली मॅन' ही प्रेक्षकांना खूप आवडली. या दिग्दर्शक जोडीनं अनेक सुपरहिट वेब सीरीज दिल्या आहेत. आता पुन्हा एकदा ही हिट जोडी ओटीटी स्क्रीनवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. 'द फॅमिली मॅन-3' ही वेब सीरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. मनोज बाजपेयी अभिनीत ही वेब सीरीज पहिल्या 2 सीझनमध्ये हिट ठरली. चाहते 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंगही दिग्दर्शकांनी सुरू केलं आहे. मनोज बाजपेयीसह संपूर्ण स्टार कास्ट सध्या नागालँडमध्ये या वेब सीरीजचं शूटिंग करण्यात व्यग्र आहे.
मनोज बाजपेयींनी केला व्हिडिओ शेअर : मनोज बाजपेयी आणि वेब सीरीजमधील काही स्टारकास्टनं इन्स्टाग्रामवर सेटवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर करून शूटिंगबद्दल माहिती दिली आहे. मनोज बाजपेयीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज बाजपेयीचं एका दरवाजावर नाव लिहून असल्याचं दिसत आहे. याशिवाय सेटवरील वातावरणही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शारीब हाश्मीनं देखील त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या सीझनमध्ये दिसणारी अभिनेत्री श्रेया धन्वंतरीनेही तिच्या इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना खुश केलं आहे. यात तिनं काही तिच्या मित्राबरोबरचे आणि नागालँडमधील सुंदर निसर्गाचे फोटो शेअर केले आहेत.