मुंबई - जुनैद खानच्या 'महाराज' या पहिला चित्रपटाला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यासाठी अखेर गुजरात उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. 1862 च्या 'महाराज' बदनामीच्या प्रकरणाभोवती केंद्रीत असलेल्या या चित्रपटाला न्यायालयाची मान्यता मिळाली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी एक्स या सोशल मीडियावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जुनैद खानने त्याच्या पदार्पणात पत्रकार आणि समाजसुधारकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं वर्णन ''अम्युचुअर परंतु उत्तम'' असं एका प्रेक्षकानं केलंय. दुसऱ्यानं जुनैदच्या अभिनयाचे "विलक्षण" म्हणून कौतुक केलंय. त्याचा अभिनय तुमच्या स्मरणात राहिल असंही त्यानं पुढं म्हटलंय.
सत्य घटनांवर आधारित 'महाराज' हा चित्रपट नेटिझन्सशी एकरूप झाल्याचं दिसत आहे. अशा आणखी काही चित्रपटाची निर्मिती व्हायला हवी असंही एकानं म्हटलंय. "बनावट मौलवी, पुजारी यांच्यावर अधिक चित्रपट व्हायला पाहिजेत, कारण असे छेडछाड करणारे प्रत्येक धर्मात असतात," असे एका युजरनं मत व्यक्त केलं. चित्रपटाच्या संदेशावर मत व्यक्त करताना एका युजरनं लिहिलं, "जे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे ते धर्मशास्त्रीयदृष्ट्या योग्य असू शकत नाही, महाराज चित्रटामधील मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे अन्वेषण!"
कथा आणि पटकथेसह दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनाही प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे. ट्विटरवर विचार शेअर करताना, एका युजरनं कमेंट केली, "नेटफ्लिक्सवर महाराज चित्रपट पाहिला, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या वरच्या थरातील सॅडिस्ट बदमाशांनी चरणस्पर्शच्या नावाखाली खालच्या पदावरील लोकांचं कसं शोषण केलं हे पाहून खूप निराशा झाली. धार्मिक प्रथांच्या सन्मानाच्या नावाखाली भोळ्या लोकांनी स्वतःची विक्री केली."