मुंबई- Janhvi Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर आता शिखर पहाडियाबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघेही अनेकदा एकत्र पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये दिसतात. अलीकडेच जान्हवी कपूरबद्दलची एक अफवा सोशल मीडियावर पसरली होती. रिपोर्ट्सनुसार जान्हवी कपूरला शिखरबरोबर तिरुपती मंदिरात लग्न करायचं होतं. आता या बातम्या निराधार असल्याचं तिनं म्हटलं आहे. एका इंस्टाग्राम पेजवर जान्हवी आणि शिखरचे काही फोटो शेअर करण्यात आले होते. या पोस्टमध्ये असं लिहण्यात आलं होत की,आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात जान्हवी कपूरला शिखरबरोबर लग्न करायचं होतं.
जान्हवी कपूरनं लग्नाच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया :आता जान्हवीनं याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तिनं कमेंट विभागात असं लिहिलं, "काहीही." सध्या ही कमेंट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान 'कॉफी विथ करण'मध्ये तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरबरोबर डेब्यू करताना जान्हवी कपूरनं तिच्या लग्नावर वक्तव्य केलं होतं. यानंतर तिचं नाव शिखर पहाडियाशी जोडलं गेलं होतं. करणच्या शोमध्ये जान्हवी म्हणाली होती, "माझ्या मनात सुरुवातीपासूनच स्पष्ट चित्र आहे. मी तिरुपतीमध्ये लग्न करणार असून या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. मला माहीत आहे की मी सोनेरी कांजीवराम साडी नेसेन आणि माझ्या केसात भरपूर मोगरा माळेन. माझा नवरा लुंगीत असेल आणि आम्ही केळीच्या पानांवर जेवण करू."