मुंबई- अलिकडेच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्टसह दिसलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पुढील काही वर्षे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये खूप बिझी असणार आहे. 'डॉन 3' आणि 'सिंघम अगेन' व्यतिरिक्त रणवीर सिंग आगामी बासिल जोसेफ दिग्दर्शित 'शक्तीमान' नावाच्या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटासाठी तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 'डॉन 3' चे शूटिंग भारतात आणि परदेशात सात महिन्यांच्या कालावधीत मार्च 2025 पर्यंत पूर्ण केलं जाईल. त्यानंतर, रणवीर सिंग 2025च्या मे महिन्यात शक्तीमान चित्रपटावर काम करण्यास सुरवात करेल. 'डॉन 3' नंतर अभिनेता रणवीर सिंग 'शक्तीमान'च्या शूटिंगमध्ये पूर्णता बिझी होईल. चित्रपटाची स्क्रिप्ट तीन वर्षांहून अधिक काळापासून विकसित होत आहे, आणि टीमने शेवटी 'शक्तीमान'च्या व्यक्तरेखेला न्याय देणारी पटकथा आणली आहे. बेसिल जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंडिया आणि साजिद नाडियाडवाला करणार आहेत.
सप्टेंबर २०२३ मध्ये इंस्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान, टोविनो थॉमसने रणवीर सिंग आणि बेसिल जोसेफ यांच्यातील संभाव्य चित्रपटात एकत्र येण्याचे संकेत दिले होते. टोविनोचा '2018' हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला तेव्हा तो लाईव्हमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधत होता. तेव्हाच रणवीर सिंगने त्याला 'मुंबईहून खूप प्रेम', असा संदेश दिला होता.