मुंबई 120 Bahadur : अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तरनं आज 4 सप्टेंबरला आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. फरहानचा नवीन चित्रपट हा भारत-चीन युद्धावर आधारित आहे. या चित्रपटाचं नाव '120 बहादूर' आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन चित्रपटाची घोषणा करताना एक मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. फरहाननं पोस्टर शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, "त्यांनी जे मिळवले ते कधीच विसरता येणार नाही, माझ्यासाठी आदरणीय परमवीर चक्र पुरस्कार विजेते मेजर शैतान सिंग आणि चार्ली कंपनीच्या 13 कुमाऊ रेजिमेंटच्या सैनिकांची कहाणी तुमच्यासमोर मांडणे खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे."
फरहान अख्तरनं केली नवीन चित्रपटाची घोषणा : याशिवाय त्यानं पुढं लिहिलं, "भारत-चीन युद्धादरम्यान 18 नोव्हेंबर 1962 रोजी लढलेली रेजांग लाची प्रसिद्ध लढाई ही आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची, अदम्य धैर्याची आणि नि:स्वार्थीपणाची कहाणी आहे. शौर्याची ही अद्भुत गाथा आपल्यापर्यंत मी पोहोचवेल याबद्दल मला आनंद होत आहे. स्क्रीनवर ही कहाणी समोर आणण्यासाठी भारतीय सैन्याचे समर्थन आणि पूर्ण सहकार्य मिळाले." या चित्रपटात 1962मध्ये झालेलं भारत-चीनमधील युद्ध दाखवण्यात येईल. या युद्धात भारताचा पराभव झाला होता. भारत-चीन युद्धात भारताच्या 120 शूर सैनिकांनी चीनच्या 3 हजार सैनिकांविरुद्ध प्राणपणानं लढा दिला होता.