मुंबई - Dharmendra Hema wedding anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर जोडप्यांपैकी एक असलेले धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आज 2 मे रोजी त्यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी अनेक चाहते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. याशिवाय धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलनं आपल्या पालकांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "माझ्या वडिलांना आणि आईला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी दोघांवर प्रेम करते आणि मला तुम्हाला मीठी मारायची आहे."
हेमा मालिनी आणि धर्मेंद्रचं लग्न :फोटोमध्ये हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या खांद्यावर डोके टेकवताना दिसत आहेत. या दोघांची जोडी खूप सुंदर असल्याचं अनेकजण पोस्टवर प्रतिक्रिया देऊन सांगत आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह 1980 मध्ये झाला. त्यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. हेमा ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे. या जोडप्याला त्याच्या लग्नापासून दोन मुले सनी देओल आणि बॉबी देओल आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट 1970 मध्ये 'तुम हसीन मैं जवान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या दोघांनीही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.