मुंबई :अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या बँडबरोबर अमेरिकन म्युझिक कॉन्सर्टवर आहे. शिकागो, न्यूयॉर्क आणि सॅन जोस सारख्या शहरांमध्ये त्याच्या अभिनयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच त्याच्या अमेरिकन कॉन्सर्टमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. आयुष्मानच्या कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्यांनी त्याच्यावर डॉलर्स फेकले. यानंतर आयुष्माननं यावर दिलेली प्रतिक्रिया ही मन जिंकणारी आहे. आता त्याचे सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत.
डॉलर फेकल्यावर आयुष्माननं दिली 'ही' प्रतिक्रिया :आयुष्मानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका कॉन्सर्टमध्ये गात असताना, मध्येच एक चाहता त्याच्यावर डॉलर्सचा वर्षाव करतो. यावेळी आयुष्मान त्याचे प्रसिद्ध गाणे' पाणी दा रंग' म्हणत होता. त्यानंतर आयुष्माननं लगेच त्याचं गाणे थांबवले आणि चाहत्याला म्हटलं, "पाजी, हे करू नका. तुम्ही हे दान करू शकता, असं करू नका. या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, खुलेपणानं दान करा, कोणालाही न दाखवता. मी त्याचे काय करणार?' हे दृश्य पाहून तिथे उपस्थित प्रेक्षकांनी आयुष्मानचे कौतुक केले.