मुंबई - बहुप्रतीक्षित सिक्वेल 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा मोठा प्रभाव दिसून आला. चाहते आणि समीक्षक यांनी सिनेमा पाहून आपली मतं 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवर व्यक्त केली आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन, अॅक्शन, अभिनय आणि संकलनाची लोक प्रशंसा करत आहेत. सुकुमार दिग्दर्शित, या चित्रपटात लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या साहसी तरुणाची कथा पुढं सुरू ठेवली आहे. यावेळी पुष्पा राजची लढाई एसपी बनवर सिंग शेकावत (फहद फासिल) याच्याशी आहे.
सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रमोशन मटेरिलमधून दिसलेली थरारक अॅक्शन, गाणी, संवाद आणि कसलेल्या कलाकारांचा फौज यामुळे सुरुवातीपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात सकारात्मकता होती. फिल्म ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार देऊन प्रशंसा केली. त्यांनी 'पुष्पा 2' 'मेगा-ब्लॉकबस्टर' असल्याचं म्हटलंय. त्यांनी दिग्दर्शकाचंही कौतुक केलंय. अल्लू अर्जुनच्या भूमिकेलाही त्यांनी खास अधोरेखित केलं आहे.
X वरील अनेक चाहत्यांनी या चित्रपटचं स्मरण पुढील दशकभर होत राहिल असं म्हटलंय. अल्लू अर्जुनला प्रेक्षकांनी 'गॉड लेव्हल परफॉर्मर' म्हटलं आहे आणि असा अंदाज लावला आहे की हा अभिनेता दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याच्या मार्गावर आहे.
आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे चित्रपटाचा अविश्वसनीय वेग. चित्रपटाचा बराच काळ रनटाइम असूनही, कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी पकड घेते याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर देखील 'पुष्पा 2' ला 'वाइल्डफायर ब्लॉकबस्टर' म्हटलंय, तर काहींना हा चित्रपट 'सर्व रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केलाय.