मुंबई Varsha Rekhate : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री पदार्पण करत आहेत. यात बऱ्याच मराठमोळ्या अभिनेत्री देखील आहेत, ज्यांना पडद्यावर चांगलचं यश मिळालं आहे. माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, ईशा कोप्पीकर, राधिका आपटे, उर्मिला मातोंडकर या सर्वांना बघून आजही नवीन मुली मोठ्या पडद्यावर चमकण्यासाठी धडपडत करत असतात. त्यातील काहींना यश मिळते. वर्षा रेखातेनं बॉलिवूड सिनेमा 'पड गये पंगे'मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला मिळालेल्या यशाबद्दल झालेल्या पार्टीत आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याबरोबर वर्षा रेखातेनं गप्पा मारल्या.
तुझ्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल आणि त्याआधी कराव्या लागलेल्या प्रयत्नांबद्दल सांग....
माझे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी मोठ्या पडद्यावर झळकावं. ते पूर्ण झालं असून आता माझ्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. त्यांनी मला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि मी माझं शिक्षण उत्तमपणे पूर्ण केलं. आता मी प्रत्यक्षात एका चित्रपटात काम करत आहे आणि मला मोठ्या पडद्यावर पाहून त्यांना खूप अभिमान वाटला. माझ्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर तो 2021 साली सुरु झाला. त्यावेळी मी पुण्याहून मुंबईत आले. त्यावेळी काय होईल याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पुढील रस्ता खडतर असणार आहे, याची कल्पना होती. त्यानंतर अनेक ऑडिशन्स दिल्या, अनेक रिजेक्शन्स पचवली आणि काही वेळा नैराश्याचा सामना केला. त्यानंतर जेव्हा माझं 'पड गये पंगे'साठी सिलेक्शन झालं, तेव्हा मी खुश झाले. मी ऑडिशन दिलेलं सर्वांना आवडलं परंतु माझ्याआधी एका अन्य मुलीचं सिलेक्शन झालं होतं. परंतु तिच्या तारखांचा घोळ होता, म्हणून मग माझी वर्णी लागली. म्हणतात ना, 'दाने दाने पे लिखा होता है खानेवाले का नाम'. मुख्य म्हणजे शे-दोनशे मुलींमधून माझी निवड झाली होती हे सुखावह होतं.
अभिनयाची आवड कधी आणि कशी निर्माण झाली?
"मी शाळेत असताना टीचर, इतर मुली यांच्या हुबेहूब नकला करायचे. त्यावेळीच माझे वडील म्हणाले होते की ही मोठी होऊन अभिनेत्री बनणार. परंतु १८-१९ वर्षांची असताना मी नाटकाला गेले होते, त्यानंतर ते मला खूप आवडलं. तेव्हा मनात आलं की आपणही या क्षेत्रात काम करावं. मग मी नाटकात काम करू लागले. माझी अभिनयाची आवड वाढत गेली. मी मुंबई गाठली आणि स्ट्रगलच्या काळात अतुल मुंगिया आणि राघव अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मी आरामनगर, मुंबई येथील नाटकांमध्ये नियमित भाग घेऊ लागले. आताही एक चित्रपट केल्यानंतर मी त्या प्रोसेसचा भाग आहे, कारण त्यातून माझ्या अभिनयाला धार चढतेय. हे खरोखरच एक अभिनय-व्यायामाचा भाग आहे. याआधी मी बऱ्याच जाहिराती, तसंच 'गुंजन रे' आणि 'तेरी आदत अब नहीं' सारखे म्युझिक व्हिडिओज केले आहेत आणि मी एक वेब सीरीज देखील केली आहे.