हैदराबाद Paytm App :पेटीएम वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर, पेटीएम ॲप 29 फेब्रुवारीनंतर काम करेल की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, आता पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ही शंका दूर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे त्यांनी युजर्सना याबाबत माहिती दिली आहे.
29 फेब्रुवारीनंतरही पेटीएम ॲप सुरू राहणार : विजय शेखर शर्मा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत म्हणाले आहेत की, "तुमचे आवडते ॲप काम करत आहे, आणि 29 फेब्रुवारीनंतरही नेहमीप्रमाणे काम करत राहील. तुमच्या पाठिंब्याबद्दल मी आणि पेटीएमच्या कार्यसंघाचा प्रत्येक सदस्य तुमचे आभार मानतो. प्रत्येक आव्हानावर एक उपाय असतो आणि आम्ही पूर्ण अनुपालन करून आपल्या देशाची सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध आहोत. पेमेंट इनोव्हेशन आणि वित्तीय सेवांच्या समावेशामध्ये भारत जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत राहील", असं शर्मा म्हणालेत.
रिझर्व्ह बँकेचं निवेदन : बुधवारी (31 जानेवारी) रिझर्व्ह बँकेनं एक निवेदन जारी केलं होतं. निवेदनात माहिती देताना आरबीआयनं म्हटलं की, पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे नियमांचं पालन झालं नव्हतं. यानंतर पुढील कारवाई आवश्यक होती. "29 फेब्रुवारी नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड माध्यम, वॉलेट, फास्टॅग, NCMC कार्ड इत्यादींमध्ये कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अपला परवानगी दिली जाणार नाही," असं रिझर्व बँकेनं नमूद केलं.
कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण :आरबीआयच्या निर्देशानंतर मागील दोन दिवसांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आरबीआयच्या आदेशामुळं कंपनीच्या वार्षिक ऑपरेटिंग नफ्यावर 300 ते 500 कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचा 49 टक्के हिस्सा आहे. परंतु त्याला सहाय्यक म्हणून नव्हे तर सहयोगी म्हणून वर्गीकृत केलं आहे. दरम्यान, शुक्रवारी (2 फेब्रुवारी) पेटीएमच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घसरण झाली.
हेही वाचा -
- Paytm बँकेचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी, 'या' दिवसापासून बँकेच्या सर्व व्यवहारांवर बंदी
- UPI transactions : पेटीएमची मोठी घोषणा; यूपीआय लाइट वॉलेटद्वारे व्यवहारांना मान्यता
- RBI Action On Paytm Bank : पेटीएमला शेअर बाजारात पुन्हा झटका, शेअरची किंमत 700 च्या खाली