नवी दिल्ली:शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालाय. तसेच जवळपास दोन डझन लोक जखमी झालेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या तयारी आणि गर्दी नियंत्रण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतेय. खरं तर जेव्हा कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांनी गाड्या आधीच गर्दीने भरलेल्या असतात आणि रेल्वे विशेष गाड्या चालवण्याचा आणि इतर व्यवस्था करण्याचा दावा करीत असतात, तेव्हा अशी चूक कशी होते, ज्यामुळे एवढा मोठा अपघात घडतो? असा प्रश्न आता निर्माण होतोय. विशेष म्हणजे अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे हजारो प्रवासी जनरल तिकिटांवर प्रवास करीत होते. परंतु या प्रवाशांसाठी अनारक्षित गाड्या वेळेवर धावल्या नव्हत्या, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. इतरही कारणे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतनं यासंदर्भात एक रिपोर्ट केलाय. त्यात अपघात का झाला, निष्काळजीपणा कुठे झाला याची कारणमीमांसा करण्यात आलीय.
प्रयागराजसाठी 8.5 हजार अनारक्षित तिकिटे विकली गेली:कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी दिल्लीहून दररोज मोठ्या संख्येने लोक प्रयागराजला जाताहेत. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यादेखील चालवल्या जातात. शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने लोकांना सुट्टी असते. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी कुंभस्नानासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात. नाव न सांगण्याच्या अटीवर एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. शनिवारी नवी दिल्ली स्टेशनवर 8.5 हजारांहून अधिक लोकांनी जनरल तिकिटे घेतली. या प्रवाशांना जनरल कोचमध्ये बसून प्रवास करावा लागला.
प्रवाशांची संख्या वाढल्यानंतरही अनारक्षित गाड्या चालवल्या गेल्या नाहीत:शनिवारी 8.5 हजारांहून अधिक प्रवाशांनी जनरल तिकिटे विकत घेतली होती, परंतु त्यांच्यासाठी प्रवास करण्यासाठी पुरेसे जनरल डबे नव्हते. शनिवारी फक्त सकाळी प्रयागराजसाठी एक विशेष ट्रेन चालवण्यात आली. अपघातापूर्वी जनरल डब्यात अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असली तरी रेल्वेने कोणतीही अनारक्षित ट्रेन चालवली नव्हती. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजला जाण्यासाठी अनारक्षित तिकिटे खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑपरेशन्स विभागाकडे अधिक अनारक्षित गाड्या चालवण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु अपघात होईस्तोवर कुंभमेळ्यासाठी विशेष अनारक्षित गाड्या चालवता आलेल्या नव्हत्या.
असा झाला अपघात?:नवी दिल्ली स्टेशन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्याला जाणारे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 13 आणि 14 वर होते. प्रयागराजला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती. एकूण चार जनरल कोच होते आणि जनरल कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात होती. त्यामुळे जेव्हा ट्रेन आली, तेव्हा आत जाऊन सीटवर बसण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. गर्दीमुळे लोक ट्रेनमध्ये अडकले. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. अनेक प्रवासी जखमी झाले. गर्दी अनियंत्रित होत चालली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वरून प्रयागराजसाठी एक विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 कडे धावू लागली. गर्दीत पायऱ्यांवर बसलेले लोक चिरडले गेले. लोकांना उठण्याची संधीच मिळाली नाही. रेल्वे स्टेशनवर गोंधळ उडाला. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला. सुमारे 25 जणांवर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर 4 विशेष गाड्या चालवण्यात आल्या:नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर कुंभमेळ्यासाठी रेल्वेकडून चार अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात आल्या, खरं तर कुंभमेळ्याला जाणारी गर्दी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून पुढे नेता येईल अन् स्थानकावरील गर्दी कमी होईल, असा त्याचा उद्देश होता. गर्दी जमण्यापूर्वी जर या गाड्या चालवल्या असत्या तर हा अपघात झाला नसता आणि जीव वाचले असते. गाड्या वेळेवर न धावण्यामागील आणखी एक कारण म्हणजे माहितीची देवाणघेवाण होण्यास होणारा विलंब आहे. खरं तर हा तपास करण्याचा विषय आहे. दुसरीकडे आरपीएफला हेदेखील लक्षात ठेवावे लागले की, जर गर्दी वाढत असेल तर त्यांनी त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. गरज पडल्यास रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार होती. परंतु अपघात झाल्यानंतर ही सगळी कामे करण्यात आली.