भोपाळ : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीपर्यंतच्या विमान प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेयर केला. तसंच त्यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापनाच्या गलथान कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानातील तुटलेल्या सीटवर बसून दिल्लीपर्यंतचा प्रवास किती वेदनादायी होता हे त्यांनी सांगितलं. त्यांना दिलेली सीट ही तुटलेली होती. तरी देखील ती सीट प्रवाशांना देण्यात आल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. या प्रकरणानंतर एअर इंडियानं माफी मागितली असून, या प्रकरणाची चौकशी देखील करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची सोशल मीडियावरील पोस्ट :
"ही प्रवाशांची फसवणूक तर नाही ना?," असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाला केला आहे. भविष्यात कोणत्याही प्रवाशाला असा त्रास होऊ नये यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का? की लवकर पोहोचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत राहणार? असे सवालही त्यांनी एअर इंडियाला विचारले आहेत.
"मला भोपाळहून दिल्लीला यायचं होतं, पुसा येथील शेतकरी मेळ्याचं उद्घाटन करायचं होतं, कुरुक्षेत्रातील नैसर्गिक शेती अभियानाला देखील भेटायचं होतं आणि चंदीगडमधील शेतकरी संघटनेच्या सन्माननीय प्रतिनिधींशी चर्चा करायची होती. मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 मध्ये तिकीट बुक केलं होतं, मला सीट क्रमांक 8C देण्यात आलं होतं."
"मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि आत खचली होती. त्यावर बसणं वेदनादायक होतं. जेव्हा मी फ्लाइट अटेंडंटना विचारलं की, सीट खराब आहे, ती का दिली गेली? त्यांनी सांगितलं की, व्यवस्थापनाला याआधी कळवलं होतं की ही सीट चांगली नाही आणि तिकीट विकू नये. अशा अनेक सीट आहेत. माझ्या सहप्रवाशांनी मला माझी सीट बदलून चांगल्या सीटवर बसण्याचा आग्रह केला, पण माझ्या फायद्यासाठी मी दुसऱ्या मित्राला त्रास का देऊ? या सीटवर बसून मी माझा प्रवास पूर्ण करेन असे मी ठरवलं."
"टाटा व्यवस्थापनानं हाती घेतल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असती, असा माझा समज होता, पण तो माझा भ्रम ठरला. मला बसण्याच्या गैरसोयीची काळजी नाही, पण प्रवाशांकडून पूर्ण रक्कम वसूल केल्यानंतर त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे हे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का?."
एअर इंडियानं मागितली माफी :केंद्रीय मंत्र्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करताना, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना भोपाळ ते दिल्ली या फ्लाइटमध्ये झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाला मनापासून खेद वाटतो. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत."
हेही वाचा -
- मध्य प्रदेशात भाजपाचा दे धक्का! शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं, वाचा नवीन मुख्यमंत्री कोण
- तीन राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? सस्पेन्स अजूनही कायम; 'हे' आहेत दावेदार
- भाजपाला वोट दिलं म्हणून मुस्लिम महिलेला मारहाण, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल