जयपूर Indresh Kumar Statement : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपा स्वबळावर 370 तर एनडीए 400 खासदारांचा टप्पा पार करेल, अशी घोषणाबाजी भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, त्यात त्यांना अपयश आलं. भाजपा प्रणीत एनडीएला केवळ 295 जागांवरच समाधान मानावं लागलं. तर यावरुनच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी थेट भाजपाला टोला लगावलाय. “जे अहंकारी होते, त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं”, असं वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केलंय.
काय म्हणाले इंद्रेश कुमार :राजस्थानमधील जयपूरजवळच्या कनोटा येथे एका कार्यक्रमात बोलत असताना इंद्रेश कुमार म्हणाले की, ज्यांनी आजपर्यंत प्रभू श्री रामांची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचं जाहीर केलं, त्यांना प्रभू श्री रामानं 240 जागांवर अडवलं. त्यांचा अहंकारच यासाठी कारणीभूत ठरलाय.” लोकसभेच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनी देखील भाजपाला टोला लगावलाय. त्यामुळं या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.