रायपूर : रायपूरहून प्रयागराजला कुंभमेळ्याला जाणारी प्रवासी बस उभ्या ट्रेलरवर धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात वेंकटनगर आणि खैरझिठी गावाजवळ घडला. या अपघातात बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. या प्रवासी बसमध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये 32 ते 33 प्रवासी प्रवास करत होते.
कोळशानं भरलेला ट्रेलर बिघडल्यानंतर छत्तीसगड मध्यप्रदेश सीमेवर उभा होता. रायपूरहून येणारी बस या ट्रेलरला धडकली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. जखमी प्रवाशांना वेंकटनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक जखमींना अनुप्पूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बस वाहकाचा मृत्यू झाला आहे. - श्याम सिदार, उपविभागीय पोलीस अधिकारी पेंड्रा रोड
प्रयागराजवरुन कुंभमेळ्याला जात होती बस :प्रयागराजला कुंभमेळ्यात जाण्यासाठी अनेक प्रवासी रात्री 11 वाजता खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसनं रायपूरहून निघाले. रात्रभर प्रवास केल्यानंतर बस पहाटे 5 च्या सुमारास गौरेला पेंड्रा मारवाही इथं पोहोचली. इथं बस चालकानं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ गाडी थांबवली. सर्व प्रवासी तिथं फ्रेश झाले आणि चहा घेतला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, "चहाच्या टपरीवर बस चालक बदलला. रायपूरहून बस चालवणारा चालक तिथंच थांबला. त्यानंतर दुसऱ्या चालकानं पेंड्राहून बस चालवायला सुरुवात केली. छत्तीसगड-मध्यप्रदेश सीमेवरील झिरो बॉर्डर परिसरात कोळशानं भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रेलरशी बसची टक्कर झाली," अशी माहिती या बसमधील प्रवाशानं दिली