गुवाहाटी Rahul Gandhi On Assam CM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या आसाममध्ये आहे. भारत जोडो यात्रेत मंदिरात प्रवेश न दिल्यानं राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर मंगळवारी निशाना साधला आहे. "ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना भीती वाटावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळंच विद्यार्थ्यांना मला भेटू दिले जात नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना फोन करुन राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना भेटू नये, असं सांगितलं," असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला.
देशाच्या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आसाममध्ये राजकीय विरोध होत आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी "आम्हाला सगळीकडं थांबवलं जात आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना भेटू नये, असं सांगितलं," असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना जे ऐकायचं आहे, ते ऐकू दिलं पाहिजे. मात्र आसाममधील कोणत्याही शाळा, महाविद्यालयांमध्ये तसं होताना दिसत नाही. आम्हाला तुमची भाषा बोलता येत नाही, असं सांगितलं जात आहे. तुमचा इतिहास असू शकत नाही, असंही सांगितलं जात आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.