नई दिल्ली: Pariksha Pe Charcha 2024 :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांमधील परीक्षेसंबंधीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 2.25 कोटींहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी ‘परीक्षा पे चर्चा 2024’साठी नोंदणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांना संबोधित करून परीक्षेबाबत चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे करण्यात आलं आहे.
शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल, नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेवर विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांची चर्चा पाहण्याची विनंती केली आहे. यासोबतच हा कार्यक्रम देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्येही दाखवण्यास सांगितलं आहे.
ऑनलाइन नोंदणी : दिल्लीतील भारत मंडपम येथे आज सकाळी 11 वाजल्यापासून 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम सुरू होईल. यावर्षी 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या या चर्चेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. यावर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रिमिंगही सर्व विद्यापीठांमध्ये केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांव्यतिरिक्त 14.93 लाख शिक्षक आणि 5.69 लाख पालकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी 11 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 पर्यंत चालली.
या लिंकवर पाहता येईल : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा'ची ही सातवी वेळ आहे. 2018 पासून त्यांनी याची सुरुवात केली. त्यानंतर, दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक लिंक शेअर केली आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी विविध महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. लिंकवर क्लिक केल्यानंतर 'https://www.narendramodi.in/parikshapecharcha' वेबसाइट उघडेल. मुख्यपृष्ठावर, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी बोर्ड परीक्षेच्या टिप्स व्हिडिओ, प्रतिमा आणि विविध टिप्सच्या मजकूराद्वारे सामायिक केल्या आहेत.