नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 10 वा दिवस आहे. मात्र आजचा दिवस काँग्रेस खासदाराच्या सिटखाली नोटांचं बंडल आढळल्यावरुन प्रचंड गाजत आहे. या प्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. मात्र काँग्रेस खासदारांच्या सिटखाली नोटांचं बंडल आढळल्यानं दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ सुरू झाला. भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर मोठा हल्लाबोल केला.
काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या सिटखाली नोटांचं बंडल :आज सकाळी राज्यसभेचे खासदार जगदीप धनखड यांनी सकाळीच राज्यसभेच्या खासदारांना फैलावर घेतलं. जगदीप धनखड म्हणाले, की "मी इथं सगळ्यांना कळवत आहे, की काल सभागृह तहकूब झाल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी करण्यात येत होती. मात्र यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांना आसन क्रमांक 222 च्या खाली नोटांचं बंडल आढळून आलं आहे. हे सीट काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिघवी यांचं असून ते तेलंगाणामधून निवडून आले आहेत. ही बाब सुरक्षा रक्षकांनी माझ्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मी घटनेची खात्री केली. घडलेली घटना चिंतादायक असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत."
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले 'मला बसला धक्का' :काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, की "मला माझ्या सिटखाली नोटांचं बंडल आढळून आल्याचं ऐकूण मोठा धक्का बसला. मी काल दुपारी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो. सभागृह दुपारी 1 वाजता उठलो. 1 ते 1.30 पर्यंत दुपारी मी खासदार अयोध्या प्रसाद यांच्यासोबत कॅन्टीनमध्ये बसलो. त्यानंतर 1:30 वाजता मी संसदेतून बाहेर पडलो. मी केवळ 3 मिनिटं सीटवर बसलो होतो. त्यामुळे माझ्या सिटखाली नोटांचं बंडल आढळून आल्यानं मोठा धक्का बसला आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक सीटवर कोणीही कसंही येऊ शकते. त्यामुळे आता जागा लॉक करुन चावी खासदारांना घरी घेऊन जावं लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप दुःखद आहेत. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकानं सहकार्य केले पाहिजे. सुरक्षा एजन्सीचं अपयश असेल, तर त्यावर कारवाई केली पाहिजे." दरम्यान आज राज्यसभेत नोटांचं बंडल आढळून आल्यानं मोठा गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडं लोकसभेचं कामकाज 9 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : कथित अदानी प्रकरणावरुन 'इंडिया' आघाडी आक्रमक, ममता बॅनर्जींच्या टीएमसीची आंदोलनाकडं पाठ
- संसद ठप्प! विरोधी पक्षाच्या गदारोळामुळं कामकाज आजही तहकूब