नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वक्तव्याविरोधात आज विरोधकांनी संसदेच्या परिसरात मोठं आंदोलन केलं. मात्र या आंदोलनात काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का मारल्याचा आरोप भाजपाच्या खासदारांनी केला. या धक्क्यामुळे खाली पडलेले दोन खासदार जखमी झाले आहेत. या जखमी खासदारांमध्ये भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्कामुळे दोन खासदार जखमी ? :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह विधानावर विरोधकांनी आंदोलन केलं. या आंदोलनात राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्क्यामुळे भाजपाचे दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे. याबाबत बोलताना भाजपाचे जखमी खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी सांगितलं, की मी पायऱ्यांजवळ उभा होता, यावेळी राहुल गांधी आले. यावेळी राहुल गांधी यांनी माझ्याजवळील खासदारांना धक्का दिला. त्यानंतर मी खाली पडलो. माझ्या अंगावर हे खासदार पडले, त्यामुळे मी जखमी झालो, असं त्यांनी सांगितलं. या घटनेत भाजपा खासदार मुकेश राजपूत हे देखील जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आरएमएल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.