पाटणा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बिहारमधील 17 उमेदवारांच्या या यादीत एकाही महिलेचं नाव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलतात. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं महिला आरक्षण कायदाही पारित केला. मात्र बिहारमध्ये एकाही महिलेला उमेदवारी दिली नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडं 2019 च्या तुलनेत 2024 ची लोकसभा निवडणूक एनडीएसाठी सोपी नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच उमेदवार निवडताना भाजपा नेते मोठी काळजी घेताना दिसत आहेत.
भाजपाच्या 17 उमेदवारांमध्ये एकही महिला नाही :भाजपानं शनिवारी लोसकभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपानं बिहारमध्ये 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र या 17 उमेदवारांच्या यादीत एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. भाजपानं पश्चिम चंपारणमधून संजय जैस्वाल, पूर्व चंपारणमधून राधामोहन सिंग, मधुबनीतून अशोक कुमार यादव, अररियातून प्रदीप कुमार सिंह, दरभंगामधून गोपाल ठाकूर, मुझफ्फरपूरमधून राजभूषण निषाद, महाराजगंजमधून जनार्धन सिंग सिग्रीवाल, सारणमधून राजीव प्रताप रुडी, उझियारपूरमधून नित्यानंद राय, बेगुसरायमधून गिरिराज सिंग, पाटणा साहिबमधून रविशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून राम कृपाल यादव, आरामधून आर के सिंग, बक्सरमधून मिथिलेश तिवारी, सासाराममधून शिवेश राम, औरंगाबादमधून सुशील कुमार सिंग आणि नवादामधून विवेक ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र एकही महिला उमेदवाराला तिकीट देण्यात आलं नाही.